शिराळा (जी.जी.पाटील)
चांदोली व कोयना अभयारण्यातील रात्रीच्या लख्ख प्रकाशात मचाणा वरील प्राणी गणनेचा मिळणार अनुभव
निसर्ग अनुभव कार्यक्रम २०२३ अंतर्गत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ५ व ६ मे २०२३ या दिवशी पाणवठ्यावरील वन्य प्राणी गणना होणार आहे. त्यानिमित्ताने वन्यजीव प्रेमी तसेच निसर्गप्रेमीना व्याघ्रप्रकल्पाच्या जंगलातील मचाणावर बुद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्री यंदा वन्यजीव पाहता येणार आहेत. गतवर्षी मे महिन्यातली बुद्ध पौर्णिमे च्या चांदन्या रात्रीची प्राणी गणना करण्यात आली पण पावसाचे वातावरण, दाट धुके यामुळे गणणेत अडथळेच निर्माण झाले होते.पण यावर्षी तरी स्वच्छ हवामान राहिल्यास निसर्गप्रेमीना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलातील पाणवठ्यावरील प्राण्यांची गणना करता येणार आहे. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्य प्राण्यांची गणना करण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे.उन्हाळ्यामध्ये जंगलातील बहुतांश पानवठे कोरडे असतात काही ठराविक पाणवठ्यावरच पाणीसाठा असल्याने वन्य प्राणी अशा पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी गर्दी करतात. अशा पाणवठ्यावर लाकडी मचान बांधण्यात येतात. त्यामुळे बुद्ध पौर्णिमेच्या चंद्राच्या लख्ख प्रकाशात वन्य प्राण्यांचे हमखास दर्शन होऊ शकते.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चांदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना अभयारण्याचा समावेश होतो .चांदोली राष्ट्रीय उद्यान अंतर्गत चांदोली हेळवाक , ढेबेवाडी या परीक्षेत्राचा समावेश आहे.तर कोयना वन्यजीव अभयारण्यात कोयना व बामनोली या परीक्षेत्रांचा समावेश होतो. दोन्ही संरक्षित क्षेत्रात मिळून एकूण ६० हुन अधिक मचाण उपलब्ध करून दिले असून निसर्गप्रेमींच्या साठी रू. १५०० फी आकारण्यात आली आहे. निसर्ग प्रेमींच्या मदतीने प्राणी गणना करण्यात येणार असून एक थरारक निसर्गानुभवही मिळणार आहे.
व्याघ्र प्रकल्पात वाघा बरोबरच गवा, बिबटे, साळींदर, रानडुक्कर, हनुमान वानर, पिसोरी, अस्वल, रानकुत्रे, सांबर, चौसिंगा, भारतीय ससा इत्यादी प्राणी आढळतात. या प्राण्यांबरोबरच सह्याद्रीत पक्ष्यांच्या अनेक प्रजाती पहावयास मिळतात. पश्चिम घाटात आढळणाऱ्या पाचशे पक्षांच्या प्रजाती पैकी २७५ प्रजातींचा येथे अधिवास आहे . सस्तन प्राण्यांच्या ३८, पक्षांच्या २४४, फुलपांखरांच्या १२०, उभयचरांच्या २२, परिसृपांच्या ४४, गोड्या पाण्यातील मासे ५०, आणि वनस्पतीच्या १४५२ प्रजाती आढळून येतात. यापैकीच महाधनेश, समुद्री गरुड, कापशी घार ,गिधाड, पारवा, निलगिरी, खवलेदार होला, पाचू, कवडा, पिवळ्या पायाची हरोळी, राखी रान कोंबडा, भारतीय करवानक इत्यादी पक्षी वैभव आढळते. अशी माहिती वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे कराड चे उपसंचालक उत्तम सावंत यांनी दिली .