विनायक जितकर
राज्यभरातून शिक्षक राधानगरीचा शिष्यवृत्ती पॅटर्न अवलंबण्यासाठी येत असून या तालुक्याचा आमदार असल्याचा अभिमान वाटतो.
सरवडे : राधानगरी तालुका हा शिष्यवृततीचा तालुका म्हणून राज्यभर ओळखला जातो. 1990 पासून आज अखेर राज्यामध्ये शिष्यवृत्तीमध्ये प्रथम येण्याचा मान राधानगरी तालुक्याला मिळत आहे. राज्यभरातून शिक्षक राधानगरीचा शिष्यवृत्ती पॅटर्न अवलंबण्यासाठी येत असून राधानगरी तालुक्याचा शिष्यवृत्ती पॅटर्न राज्याला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते शिक्षण विभाग, पंचायत समिती, राधानगरी यांचेमार्फत सरवडे, ता.राधानगरी येथे पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ दरम्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, राधानगरी तालुका हा तसा ग्रामीण, दुर्गम व डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो. शहरी भागाच्या तुलनेत आजही म्हणाव्या तितक्या शैक्षणिक सेवा सुविधा तालुक्याच्या बहुतांशी भागात पोहचलेल्याच नाहीत. पण तरीही उपलब्ध शैक्षणिक सुविधांचा वापर करून येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी जे यश संपादन केले आहे ते खरोखरच राधानगरी शिक्षण पॅटर्नची खासीयत आहे. तालुक्यामध्ये कार्यरत असणारे दर्जेदार शिक्षक व पालकांमार्फत विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येणारे परिश्रम यामुळे तालुक्यात गुणवंत विद्यार्थी तालुक्यात घडत आहेत. यामुळेच मला देखील राज्यात काम करत असताना या तालुक्याचा आमदार असल्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. |
यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी बी.एम.कासार म्हणाले की, राधानगरी तालुक्याने गेली पस्तीस वर्षे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन करण्याचा प्रयत्न कायम ठेवला आहे. सराव परीक्षा, रचनावादी अध्यापन, नवीन तंत्रे, गट चर्चा, ज्ञान रचनावादी अभ्यासक्रम या तंत्रांचा वापर करून तालुक्यातील शिक्षकांनी स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे.
यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष हिंदूराव चौगले, माजी उपसभापती अरुणराव जाधव, माजी उपसभापती वनिता पाटील, शिक्षणाधिकारी बी.एम.कासार, शिवाजी पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी शशिकुमार पाटील, संभाजी पाटील सर, अशोक पाटील, डी.पी.पाटील, जोतीराम पाटील, रानमाळे सर यांच्यासह प्रमुख मान्यवर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.