पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2023 चे थाटात उद्घाटन
पुणे विभागातील जवळपास 750 अधिकारी-कर्मचारी खेळाडू 50 प्रकारच्या विविध खेळामध्ये सहभागी
खेळामुळे आरोग्य व मन सुदृढ राहते, प्रत्येकाने खेळाचा आनंद घ्यावा – पालकमंत्री दीपक केसरकर
*पालकमंत्री श्री. केसरकर यांच्याकडून दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन
कोल्हापूर:- प्रत्येक खेळाडूंनी खेळ केवळ खेळाच्या भावनेतूनच खेळला पाहिजे. त्यामुळे खेळाडूंमध्ये परस्पर सहकार्य, शिस्त, संघटन, सहनशीलपणा येतो. चांगले व्यक्तिमत्व घडवण्यात मैदानी खेळांचे आत्यंतिक महत्व आहे. आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना स्पर्धेतून मिळते. खेळातूनच सुदृढ आरोग्य व सुदृढ आरोग्यातून सुदृढ मन निर्माण होत असते. त्यामुळे प्रत्येक खेळाडूंनी सुदृढ मन व आरोग्यासाठी खेळाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2023 चे उद्घाटन पोलीस कवायत मैदान येथे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीव्दारे करण्यात आले. यावेळी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण तसेच महसूल विभागाचे विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व उपायुक्त, पाच जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी तसेच महसूल विभागाचे सर्व उपजिल्हाधिकारी, तहसिलदार व नायब तहसिलदार तसेच महसूल विभागातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री केसरकर पुढे म्हणाले की, शासनाच्या अनेक विभागात कामाचा प्रचंड ताण असतो त्यातील महसूल विभाग एक आहे. कामाचा अतिरिक्त ताण कमी व्हावा, नेहमीच्या कामापासून थोडे दूर जाऊन आपल्या शरीराला व मनाला उभारी येण्यासाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा महत्त्वाच्या ठरत आहेत. खेळामुळे आरोग्य सुदृढ राहते व जिथे सुदृढ आरोग्य असते तिथे सुदृढ मन कार्य करत असते. सुदृढ आरोग्य व मनामुळे काम करण्यात एक प्रकारचा चांगला उत्साह असतो व याचा फायदा सर्वसामान्य लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ अधिक गतीने मिळवून देण्यात होतो, असे त्यांनी सांगितले.
विविध क्रीडा प्रकारातून शरीराचा चांगला व्यायाम होतो, शरीर बळकट होते; पण खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. खेळामुळे मनोरंजन होते व मनाला उत्साह मिळतो. खेळात मनाची एकाग्रता साधता येते. खेळामुळे आपल्या जीवनाला एक प्रकारची शिस्त लागते. जो संघ जितका शिस्तबद्ध असेल तितके सामना जिंकणे त्याला सोपे होते, असे सांगून केसरकर पुढे म्हणाले की, आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला मर्दानी खेळाचा एक मोठा इतिहास आहे व याच शहरात महसुली क्रीडा स्पर्धा होत असल्याचा आनंद आहे. तसेच कोल्हापूर महसूल विभागाने या क्रीडा स्पर्धेचे नीटनेटके आयोजन केलेले दिसून येत आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या स्पर्धेत सहभागी झालेल्या पुणे विभागातील सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करुन स्पर्धेसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या महसूल विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपापल्या क्रीडा प्रकारात चांगले प्रदर्शन करावे व खेळाचा आनंद घ्यावा, असे आवाहन केले. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानून सर्व स्पर्धकांच्या अंगी असणा-या मूलतः कला गुणांना व खेळातील प्राविण्यास वाव देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
स्पर्धेमध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर येथील स्पर्धकांनी संचलन केले. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक, सांगली जिल्हा व्दितीय व सातारा जिल्हा यांचा तृतीय क्रमांक आला. स्पर्धेच्या उद्घाटनानंतर 100 मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात येवून विजेत्या स्पर्धेकांना विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धा दि. 24 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीमध्ये कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे. स्पर्धेमध्ये 50 विविध खेळामध्ये अंदाजे 750 स्पर्धेकांनी सहभाग घेतला आहे. यावेळी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके झाली .
सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव पर्यावरण रक्षणाची चळवळ होईल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे