कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला वेग — पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व वाहतूक सुविधांचा विकास आराखडा
कोल्हापूर – शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वाहतूक कोंडी यांसारख्या मूलभूत प्रश्नांना कायमस्वरूपी उपाय मिळवण्यासाठी महापालिकेकडून मोठ्या विकास आराखड्याला प्रारंभ झाला आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पाठपुराव्यानंतर शहर विकासाच्या विविध प्रकल्पांना गती मिळाली असून येत्या आठवड्यात अनेक कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे.
महापालिकेने दोन टप्प्यांत ४१९ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला असून यात सुरू असलेल्या कामांना गती, पाणीपुरवठा योजनेचे अत्याधुनिकरण, रस्ते दुरुस्ती, स्वच्छतेसाठी नवी साधने, तसेच वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे. रस्ता दुरुस्ती व निर्मितीसाठी महापालिका आता स्वतःचा डांबर निर्मिती प्लांट उभारणार आहे. नवीन प्लांट कार्यान्वित होईपर्यंत भाडेतत्त्वावर प्लांट घेऊन रस्त्यांच्या कामांना गती दिली जाणार आहे. तसेच टीडीआर (ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स) प्रक्रियेलाही वेग देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. टीडीआरमुळे शहरातील रस्ते, उद्याने आणि सार्वजनिक सुविधा विकसित होण्यास मदत होते, शासनाचा खर्च कमी होतो आणि शहराचा नियोजित विकास साधता येतो.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोड प्रकल्पाला गती मिळणार असून, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्त संयुक्तपणे इतर वाहतूक सुधारणा उपाययोजना राबविणार आहेत. शहरातील ४०,००० प्रॉपर्टीचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार असून, १४० ओपन स्पेस महापालिकेच्या नावावर नोंदवली जाणार आहेत. तसेच तेरा मेगावॅट सौरऊर्जेच्या प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेच्या विजेच्या खर्चात मोठी बचत केली जाणार आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महापालिकेला नागरिकांच्या आवश्यक सेवांचे आणि दाखले विहित मुदतीत देण्याचे आणि कामकाजात गती आणण्याचे निर्देश दिले. कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रत्येक विकासकामात पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. त्यांनी विकासासाठी आवश्यक निधी शासन, नियोजन विभाग आणि विविध फायनान्स एजन्सीमार्फत उपलब्ध करून देण्याचा पाठपुरावा करण्याचे सांगितले.
आमदार अमल महाडिक यांनी सीएसआर निधीतून रस्त्यांची कामे करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच पार्किंग व्यवस्थेबाबतही विविध सूचना त्यांनी बैठकीत मांडल्या. या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.












































