नवीन प्रदक्षिणा मार्ग व परिवार देवता मंदिर संवर्धन कामांचा समावेश
कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग व परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा शुभारंभ शनिवार, २० जून रोजी सकाळी होणार आहे. हा शुभारंभ केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल. महाराष्ट्र शासनाच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व करवीर निवासिनी श्री अंबाबाई विकास आराखडा अंतर्गत हा विकास प्रकल्प राबवला जात आहे. नवीन प्रदक्षिणा मार्गामुळे भाविकांना मंदिर प्रदक्षिणा करताना अधिक सुविधा, सुसज्जता आणि सुरक्षितता उपलब्ध होणार आहे. तसेच परिवार देवता मंदिरांचे संवर्धन व सुशोभीकरण केले जाणार आहे.
यावेळी, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा सह पालकमंत्री कोल्हापूर माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह खासदार शाहू छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, कोल्हापूर महानगरपालिका महापौर रुपाराणी निकम, सर्वश्री आमदार सतेज पाटील, अरुण लाड, जयंत आसगावकर, विनय कोरे (सावकर), राजेंद्र पाटील (यड्रावकर), चंद्रदीप नरके, अमल महाडिक, डॉ. अशोकराव माने, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, विभागीय आयुक्त, पुणे शीतल तेली-उगले उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर केंद्रीय गृह व सहकार मंत्री यांची कोल्हापूर येथे राजकीय सभा तसेच इचलकरंजी येथे सहकारी बँकेचा कार्यक्रम व राजकीय सभा होणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्याकडून पूर्वतयारीबाबत आढावा
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या दौऱ्यात संबंधित अधिकाऱ्यांनी नेमूण दिलेली जबाबदारी अचूक पार पाडावी, याबाबतीत कोणतीही हयगय नको तसेच प्रत्येक ठिकाणी समन्वयाने कामकाज करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड उपस्थित होते.























































