खाकी वर्दी अंगावर चढवल्यावर ह्दयात आपसुक समाजाप्रती कर्तव्यभावना जागी होते. या कर्तव्यभावनेतून पोलीस दलाची प्रतिमा उजळली जावी यासाठी कधी गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी त्यांच्याशी पंगा घ्यावा लागतो, तर वारकऱ्यांत राहून संतमहिमा अनुभवत वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रचंड धावाधाव करावी लागते. वारीचा अनुभव हा कर्तव्याला आणखी उंचीवर नेऊन ठेवतो. आठ वेळा पंढरीच्या वारीचा बंदोबस्त करताना आलेल्या अनुभवात पोलिसांतील सहनशीलता, संवेदनशीलता, संयम आणि सत्कर्माची जाणीव पहायला मिळते. या जाणीवेतून पोलीस दलाची प्रतिमा उजळली जावी असाही गजर वारकऱ्यांच्या मुखातून ऐकायला मिळतो, तेव्हा मन अगदीच भावनिक होते.
महाराष्ट्राच्या संतपरंपरेत अत्यंत मानाचे स्थान असलेल्या वारीचा बंदोबस्त नशिबी येणे आणि वारकऱ्यांया पांढऱ्या पेहरावासोबत खाकीने बेभान होऊन मिसळून जाणे याची संधी अपवादात्मक अधिकारी, अंमलदारांना मिळते. आठ वर्ष मी स्वतः कधी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या, तर कधी जगत् गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या बंदोबस्तात प्रभारी पोलीस अधिकारी म्हणून स्वतःचे योगदान पुरेपूर देण्याचा प्रयत्न केला. लाखो वारकऱ्यांचे नेटके नियोजन करताना पोलिसांवर विविध प्रकारची जबाबदारी असते. लाखो वारकऱ्यांचा मेळा जेव्हा माऊली माऊलीचा गजर करत चालत असतो, तेव्हा त्यांच्या सुरक्षेला आद्य प्राधान्य देणे हे पोलिसांसमोर आव्हानच असते. वारकरी एका बाजूने चालत असतात, त्याच रस्त्यावर दुसऱया बाजुने वारकऱ्यांची, प्रशासनाची, समाजसेवकांची वाहने धावत असतात. त्यामुळे संभाव्य आपत्ती टाळण्यासाठीचा प्रयत्न खून जिकिरीचा असतो. मात्र वारकऱ्यांची अमोघ वाणी, एकमेकांना सहकार्य करण्याची त्यांची आपुलकी, प्रशासनाच्या सुचनांचे पालन करण्याचे त्यांचे कर्तव्य याचा हे सर्व आव्हान पेलताना अनुभव कायम येतो. वारी ज्या मार्गावरून जाणार आहे, त्या मार्गावरील एकाही गावातील जनजीवन विस्कळीत होणार नाही याबाबतही पोलीस काळजी घेत असतात.
संवादावर भर, प्रत्येकात माऊली…
पालखी सोहळय़ात चालताना प्रत्येक पावलास पंढरीची आस लागलेली असते. पालखी सोहळा प्रमुखांशी कायम संवाद ठेवून पोलीस त्यांच्याशी समन्वय साधत पुढची दिशा ठरवतात. पुढची दिशा ठरवताना तेथील स्थानिक प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, समाजसेवी संघटनांना यात समावून घेत पोलिसांकडून एकोप्याचे दर्शन घडेल असा बंदोबस्त लावला जातो. मला वास्तविक आठव्यांदा वारी बंदोबस्ताची संधी मिळाली होती. त्यामुळे वारीच्या मार्गावरील माझा स्नेह अधिक वृद्धिंगत होत आहे. यापूर्वी मी आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान, पुणे ते पंढरपूर वारी मार्ग येथील पोलीस बंदोबस्ताची धुरा सांभाळली होती. या वर्षी मंदिर सुरक्षा आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणारी शासकीय महापूजेच्या वेळची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे सरांनी माझ्यावर सोपवली होती. या जबाबदारीला खरे उतरत मी अविश्रांत बंदोबस्ताच्या कर्तव्यात स्वतःला वाहून घेतले. पालखी प्रस्थान ते एकादशीच्या दिवशी महापूजा या सर्व टप्प्यांवर वरिष्ठांनी माझ्यावर सोपविलेली जबाबदारी ज्या कर्तव्यभावनेने निभावली, तो खरा विठुरायाचा आशिर्वाद आणि वारकऱ्यांचा जिव्हाळाच म्हणायचा.
दोन महिन्यापुर्वीच होते नियोजन…
वारीत लाखो वारकरी ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता एक एक पाऊल पुढे टाकत असतात. २० – २१ दिवसांचा हा सोहळा अतिसुरक्षितपणे आणि निविघ्नपणे पार पाडण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाकडून दोन – तीन महिने अगोदरच तयारी सुरू असते. विशेषतः ही जबाबदारी पार पाडण्याचे काम कोल्हापूर परिक्षेत्राकडेच असते. यंदाचा विचार करता परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सर यांनी मॅरॉथॉन बैठका घेत प्रत्येक अधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल सर, साताराचे पोलीस अधिक्षक समीर शेख, सोलापूर ग्रामीणचे अधिक्षक शिरीश सरदेशपांडे यांची टिम आपआपल्या भागात वारी बंदोबस्तासाठी सज्ज होत होती. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या प्रत्येक आदेशाचे पालन करताना वारी आणि वारकऱ्यांची सुरक्षितता याकडे डोळय़ात तेल घालून हे सारे या अध्यात्माच्यासोहळय़ात सहभागी झाले. |
हजारो पोलीस बंदोबस्तात
वारकऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात असली, तरी पुणे ग्रामीण व सातारा जिह्यात किमान प्रत्येकी ३ ते ४ हजार पोलीस त्यांच्या सुरक्षिततेसाठी आपला जीव ओतताना पहायला मिळाले. सोलापूर जिह्यात दोन्ही पालख्या एकत्र येत असल्याने वारकऱ्यांच्या आकडय़ांची गणतीच करता येत नाही. या अगणित वारकऱ्यांना दहा हजारांपेक्षाही अधिक पोलिसांचे मनुष्यबळ वाट दाखवत असते. त्यांना लागेल ते सहकार्य करून कर्तव्यातून अध्यात्माचाही अनुभव घेत असते. मुक्कामाच्या ठिकाणी सुर्योदयापुर्वी वारकऱ्यांच्या दिंडय़ा निघत असतात. पहाटेच्या निसर्गरम्य वातावरणात वारकऱ्यांचा माऊली माऊलीचा गजर भारावून सोडतो. दिंडय़ा निघण्यापुर्वीच दोन तीन तास अगोदर त्यांची वाहने विसाव्याकडे पुढे जातात. वारकऱ्याचे चालणे आणि वाहनांचे धावणे यात काही अनर्थ घडू नये याची सर्वस्वी जबाबदारी घेत पोलीस जीवाचे रान करत असतात.
जमेल तसेच, जमेल तिथे तडजोड करून रात्रंदिवस काढावा लागतो हेही पोलिसांच्या कर्तव्यभावनेचे एक वास्तव आहे. सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरिष सरदेशपांडे सर यांचा गृहपाठ, छोटया छोटया गोष्टीचे नियोजन, अपर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव यांचा पाठपुरावा, पंढरपूरचे डीवायएसपी डॉ. अर्जुन भोसले यांच्या अंमलबजावणामुळे वारी अत्यंत सुरक्षित आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडली. मागील २ वर्षाचा अनुभव गाठीशी असलेले तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम रायगडहून खास वारी बंदोबस्तात सहभागी झाले होते. वारी बंदोबस्तात वारीचे पुण्य पदरात पाडण्यासाठी पोलिस पण मागे नसतात. सातारचे पोलीस उपनिरीक्षक श्री तलवार यांची सेवानिवृत्ती अवघ्या काही दिवसांवर आली असताना त्यांनी स्वतःहून हट्टाने वारी बंदोबस्त मागून घेतला. वारीचा बंदोबस्त हा आपल्या आयुष्यभराच्या पोलीस दलातील सेवेचा अखेरचा बंदोबस्त हा विचार मन हेलावून नेतो. अशी कित्येक उदाहरणे घेऊन पोलीस वारीच्या मार्गावर चालत असतात. यापुढील काळातही पोलिसांची कर्तव्यभावना कायम राहिलच….कर्तव्याचा झेंडा आणि अध्यात्माचा झेंडा एकत्र फडकत राहिल यात शंका नाही.