सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरातील काडोली ते संगमनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.रायगडच्या पेण तालुक्यातील चुनाभट्टी गावात बाळगंगा नदीचे पाणी शिरले आहे. या गावाला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना स्थलांतरित होण्याची नोटीस दिली आहे.परशुराम घाटातील वाहतूक दरड बाजूला करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे काही काळासाठी मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड बाजूला केल्यानंतर ती पूर्ववत करण्यात येईल. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन देखील सज्ज झाले आहे.
राज्यातील बहुतांश भागात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. कोकण आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाड्यात सर्वदूर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. |
कोल्हापूरच्या रांगणा किल्ल्यावर 100 पर्यटक अडकले होते. त्यांची स्थानिकांच्या मदतीने प्रशासनाने सुटका केली. हे पर्यटक रांगणा गडाकडे जाणाऱ्या रस्त्यात असणाऱ्या ओढ्यातील पाणी पातळी वाढल्यामुळे अडकून पडले होते. हवामान विभागाकडून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे रखडलेली खरिपाच्या पेरण्यांना वेग येणार आहे. तसेच पावसाने ओढ दिलेल्या भागातील पिकांना जीवदान मिळणार आहे.