महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा 37 वा वर्धापन दिन मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत आज उत्साहात साजरा करण्यात आला.मंत्रालयाच्या परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर यांच्यासह राज्यभरातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महासंघाच्या वतीने उभारण्यात येणार असलेल्या कल्याण केंद्राच्या कामासाठी उल्लेखनीय निधी संकलन करणाऱ्या अकरा समन्वय समिती सदस्यांचा मुख्य सचिवांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्ताने पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले.मुख्य सल्लागार श्री. कुलथे यांनी कल्याण केंद्राचे स्वप्न सर्वांच्या सक्रियतेने आणि सहकार्याने निश्चितच लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष विनोद देसाई यांनी केले. सरचिटणीस समीर भाटकर यांनी महासंघाच्या आगामी योजनांबाबत माहिती दिली. मीनल जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले.