मुख्य कार्यक्रमांना लाखो भाविक उपस्थित राहणार…
मुदाळ – क्षेत्र आदमापूर, ता. भुदरगड येथील सद्गुरू बाळूमामांच्या भंडारा यात्रेला प्रारंभ झाला आहे. रथ मिरवणूक, पालखी सोहळा, भाकणूक व महाप्रसाद या मुख्य कार्यक्रमांना लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीने यात्रेची जय्यत तयारी केली आहे, अशी माहिती मंदिर समितीच्या कार्याध्यक्षा रागिनी खडके यांनी दिली.
भाविकांच्या वाहनांसाठी दोन तळ तयार केले असून, त्यात हजारो वाहने थांबतील अशी व्यवस्था आहे. गर्दी लक्षात घेऊन नियमित टॉयलेट बाथरूमशिवाय जादा टॉयलेट व्हॅनची सोय केली आहे. बाळूमामांचे रांगेतून दर्शन मिळावे, यासाठी पंढरपूर देवस्थानप्रमाणे रांगेत बैठक व्यवस्था केली आहे.
भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये, महाप्रसादाचा लाभभक्तांना सावलीत घेता यावा यासाठी भव्य मंडप उभारला आहे. महाप्रसादावेळी भक्तांना मिनरल वॉटरची व्यवस्था करण्यात येणार आहे. रथ मिरवणूक व पालखी सोहळा शांततेत होण्यासाठी नियमावली केली आहे. पालखी सोहळा डॉल्बीमुक्त होणार आहे. यात्रा शांततेत व सुरक्षितेत पार पाडण्यासाठी भाविक, ग्रामस्थ, विविध संस्था, व्यावसायिक, व्यापारी, कर्मचारी तरुण मंडळे, विविध विभागांचे पदाधिकारी यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही कार्याध्यक्षा रागिनी खडके यांनी केले.
यावेळी मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले, सचिव संदीप मगदूम, सरपंच विजयराव गुरव, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, विश्वस्त शामराव होडगे, रामाण्णा मरेगुदरी, पुंडलिक होसमणी, बसवराज देसाई आदी उपस्थित होते.