पुराच्या पाण्यात नौकायन करून 11 केव्ही लक्षतीर्थ फिडरवर तांत्रिक दुरुस्ती कार्य…
कोल्हापूर – चंदगड तालुक्यातील ताम्रपर्णी नदीच्या पुराच्या वेगवान प्रवाहात जलतरण करीत महावितरण कोवाड शाखेच्या जनमित्रांनी कागणीसह सात गावांचा खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी जीवाची बाजी लावली. दोन तास वीज वाहिनीवर काम करून कागणी 11 केव्ही गावठाण फिडरमध्ये झालेला बिघाड दुरुस्त केला.
कागणी, कल्याणपूर, बुक्कीहाळ खुर्द, बुक्कीहाळ बुद्रुक, कौलगे, होसुर, किटवाड, हुंदळेवाडी या गावांचा वीजपुरवठा अखेर सुरळीत केला. सहायक अभियंता संजय मगदूम यांच्या नेतृत्वात जनमित्र नागोजी पाटील, अजित परीट यांनी ही धाडसी कामगिरी केली. याकरीता राम शिरढोने, युवराज कोकितकर, मारुती पाटील, विलास कदम, नागनाथ नांदवडेकर यांनी सहकार्य केले. महावितरणच्या कोल्हापूर शहर पश्चिम विभागातील फुलेवाडी व दुधाळी शाखेच्या जनमित्रांनी पुराच्या पाण्यात नौकायन करून 11 केव्ही लक्षतीर्थ फिडरवर तांत्रिक दुरुस्ती कार्य केले.
तत्पुर्वी लक्षतीर्थ फिडरवर बिघाड झाल्याने मीराबाग व लक्षतीर्थ परिसरातील जवळपास नऊ हजार ग्राहकांना पर्यायी वीजपुरवठ्याची सोय करण्यात आली होती. दुरूस्तीनंतर पुन्हा लक्षतीर्थ फिडरवरून त्या ग्राहकांना वीजपुरवठा सुरू करण्यात आला. आपल्या घरातील उजेड हेच आमचे पदक याच भावनेतून धाडसी सेवाकार्य करणारे जनमित्र ‘प्रकाशदूत’ ठरले.अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता मनोहर पवार,जनमित्र संदीप पाटील, संजय राठोड, संदीप फारणे, युवराज जाधव यांनी ही कामगिरी केली.
![]() |
![]() |