कनिष्ठ पदावर उच्चशिक्षित मुलं अर्ज करतात याचा अर्थ बेरोजगारी आटोक्यात आणण्यामध्ये भाजप सरकार फेल ठरलेय…
मुंबई – महिलांचा सन्मान आणि सुरक्षा करुन सरकार चालवू असे आश्वासन नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये देशातील जनतेला दिले होते परंतु आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन करणार्या महिला कुस्तीपटूंवर पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा दिल्लीत जंतरमंतरवर जो प्रकार झाला त्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
गेले दहा दिवस दिल्लीच्या जंतरमंतरवर महिला कुस्तीपटू आंदोलनाला बसल्या आहेत. काल मध्यरात्री पोलिसांनी पाऊस सुरु असताना लाठीचार्ज केला आणि शिवीगाळ करून आंदोलनाचा अधिकार मोडण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकारच्या पोलीसांनी केला याबद्दल महेश तपासे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा, त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी आणि त्यांच्या मागण्यांवर यथोचित कारवाई व्हावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे असेही महेश तपासे म्हणाले.
देशातील बेरोजगारीचा एक डेटा प्रसिद्ध झाला असून त्यात चार महिन्यांचा उच्चांक बेरोजगारीने मोडला आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करु आणि देशात ‘अच्छे दिन’ आणू असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु दिवसेंदिवस पाहिले तर बेरोजगारीचा आलेख वाढतच चालला आहे. रोजगाराची संधी उपलब्ध नाही. कनिष्ठ पदावर उच्चशिक्षित लोक येऊ लागले आहेत. याचा अर्थ बेरोजगारी आटोक्यात आणण्यामध्ये भाजपसरकार फेल ठरले आहे असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे. या देशातील बेरोजगारी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूर करु शकत नाहीत त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत देशातील सुशिक्षित तरुण बेरोजगार हा मोदींच्या भुलथापांना बळी न पडता भाजपला मतदान करणार नाही असा दावाही महेश तपासे यांनी केला आहे.