विनायक जितकर
तटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित…
कोल्हापूर : अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळ पाटाकडील तालीम मंडळ अ संघांवर ३-० असा विजय मिळवत अटल चषक फुटबॉल स्पर्धेचा मानकरी ठरला. विजेत्या शिवाजी संघांला रोख दोन लाख ५५ हजार रुपये चषक देऊन गौरवण्यात आले.
उप विजेत्या पाटाकडील तालीम मंडळ संघांला रोख एक लाख ५५ हजार रुपये, चषक देण्यात आला. तटाकडील तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केली होती.पूर्वार्धात दोन्ही संघांनी वेगवान खेळ केला. पाटाकडीलच्या रोहित पोवारचा फटका शिवाजी संघांचा गोलरक्षक मयूरेश चौगलेने चपळाईने रोखला. रोहित पोवारचा वेगवान फटका गोलखांबावरुन गेला.शिवाजीच्या संदेश कासारचा फटका गोलरक्षक शिब्बीर गणी याने रोखला.
मध्यंतरास दोन्ही संघ गोल न करु शकल्याने सामना शून्यगोल बरोबरीत होता.उत्तरार्धात ४४ व्या मिनिटाला शिवाजी संघांने यशस्वी चढाई केली. राईट विंगमधून करण चव्हाण बंदरे याने पाटाकडीलच्या गोलक्षेत्रात चेंडू वर ताबा मिळवत सफाईदार गोलची नोंद केली.परतफेड करण्यासाठी पाटाकडीलने जोरदार प्रयत्न सुरू केले. पाटाकडीलच्या अदित्य कल्लोळीला रोखल्याने डी च्या जवळ फ्री किक मिळाली. अक्षय मेथेने मारलेली फ्री किकवर मारलेला फटका शिवाजी संघांचा गोलरक्षक मयूरेश चौगलेने रोखला. त्यानंतरची काॅर्नर किक गोलरक्षक चौगलेने पंच केली. ओंकार मोरेची चढाई गोलरक्षक चौगलेने चपळाईने रोखली.त्यानंतर शिवाजी संघांच्या ७८ व्या मिनिटाला सिद्धेश साळोखेने मध्यरेषेपासून चेंडूवर ताबा मिळवून तीन ते चार खेळाडूंना चकवा देत गोल केला. दोन गोलच्या आघाडीनंतर शिवाजी संघांने आक्रमक खेळ केला. जादा वेळेत ८१ व्या मिनिटाला करण चव्हाण बंदरेने शिवाजी संघांचा तिसरा मैदानी गोल केला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी नगरसेवक सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, तुषार देसाई उपस्थित होते.