सडोली खालसा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडाका! १३ जणांना कारवाईचा दणका
कोल्हापूर | WATCH TEAM करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर करवीर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. शेतातील जनावरांच्या शेडमध्ये सुरू असलेल्या या जुगारावर छापा टाकत पोलिसांनी १३ जणांविरुद्ध कारवाई केली. घटनास्थळावरून तब्बल ३ लाख ८२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सडोली खालसा येथील कडकाचा माळ परिसरातील शेतात गणपती पाटील यांच्या जनावरांच्या शेडमध्ये तीन पानी पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी माहितीची दखल घेत ३१ ऑक्टोबर ला सायंकाळी ४.१० वाजता पोलिस पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला.यावेळी काही जण पैसे लावून तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून १३ जणांविरुद्ध कारवाई केली.मुद्देमालाचा तपशील धक्कादायक! या कारवाईत पोलिसांनी आठ मोटारसायकली, १२ मोबाईल हँडसेट आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ८२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जुगार सुरू असलेल्या जागेच्या मालकाचाही या प्रकरणात समावेश करण्यात आला आहे.महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ नुसार संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे.
अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची मोहीम
कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिले आहेत. त्याच अनुषंगाने करवीर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कम्मकर आणि गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही मोहीम राबवली. अवैध जुगार अड्ड्यांविरोधातील या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


























