लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सप्ताहभर विविध उपक्रम
शासकीय कार्यालये, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि ग्रामीण भागात नागरिकांना मार्गदर्शन; लाच मागितल्यास तक्रार करण्याचे आवाहन
कोल्हापूरWATCH TEAM : भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मिती आणि नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार देशभर दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जिल्ह्यात विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले.
यावर्षीच्या दक्षता जनजागृती सप्ताहाची संकल्पना ‘समृद्धीसाठी सत्यनिष्ठा’ (Probity for Prosperity) अशी आहे. २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या सप्ताहाच्या माध्यमातून शासकीय अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रामाणिकपणा व भ्रष्टाचारविरोधी जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
सप्ताहाच्या प्रारंभी २६ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथील ताराराणी सभागृहात जिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या उपस्थितीत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ देण्यात आली. यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या सप्ताहात भ्रष्टाचारविरोधी कारवाईसंदर्भात नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. विविध सामाजिक संघटना व गटांपर्यंत पोहोचून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. शासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचारविरोधी जनजागृतीचे बॅनर आणि स्टिकर्स लावण्यात आले.
आकाशवाणी कोल्हापूर, रेडिओ केंद्र तसेच स्थानिक न्यूज चॅनेलच्या माध्यमातून विभागाच्या कार्यपद्धतीची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. स्थानिक वृत्तपत्रे, केबल नेटवर्क, व्हॉट्सॲप ग्रुप आणि सोशल मीडियाचाही जनजागृतीसाठी प्रभावी वापर करण्यात आला.
विशेष म्हणजे कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष नागरिकांच्या भेटी घेऊन भ्रष्टाचाराविरोधात जागरूकता निर्माण करण्यात आली. शासकीय कार्यालये, विविध संस्था आणि ग्रामीण भागात नागरिकांना लाच मागितल्यास तक्रार कशी करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांशी संवाद साधून भ्रष्टाचारविरोधी जनजागृती करण्यात आली.
स्वयंसेवी संस्था, अशासकीय संघटना, सेवानिवृत्त सैनिक, महिला संघटना, वाहनचालक-मालक संघटना, कामगार संघटना तसेच एमआयडीसी परिसरातील घटकांशी संवाद साधून शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी आणि भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. महिलांमध्येही विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
लाच मागितल्यास तक्रार करा!
शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूर विभागासाठी टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच विभागाच्या अधिकृत संपर्क क्रमांकांवर तक्रार करता येणार आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर यांच्या वतीने हा जनजागृती सप्ताह पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील आणि पोलीस उपअधीक्षक राजेंद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून, भ्रष्टाचाराविरोधात जागरूक राहून तक्रार करण्याचे आवाहन विभागाने केले आहे.
|
 |
|