‘ईव्हीएम नको होतं तर राजीव गांधींच्या काळात का आणलं?’ रामदास आठवलेंचा काँग्रेसला सवाल

खेड /मुंबई WATCH TEAM- रंजित आवळे – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या खेड तालुका मेळाव्यात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ईव्हीएम मशीनवरून विरोधकांवर, विशेषतः काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. “तुम्हाला जर बॅलेट पेपरच हवा होता, तर मग राजीव गांधी यांच्या कार्यकाळात ईव्हीएम मशीन देशात का आणली?” असा थेट सवाल करत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. खेड येथे आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या तालुका कार्यकर्ता मेळाव्यात ना. रामदास आठवले बोलत होते.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे;मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे;कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजक सुशांत सकपाळ; रायगड जिल्हा संपर्क प्रमुख राहुल सोनवले ; माजी आमदार सूर्यकांत दळवी; नगरसेविका साधना बोत्रे; जिल्हा अध्यक्ष रुके; आदेश मार्चंडे;रेश्मा नेवरेकर; सुमित मोरे; अमित तांबे; सुशील महाडिक; अपूर्वा जाधव; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेशमध्ये जेव्हा काँग्रेस अथवा त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार आले, तेव्हा आम्ही कधीही ‘व्होट चोरी झाली’ असा आरोप केला नाही. ज्याला जनतेचे बहुमत मिळते, त्याला सत्तेवर येण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे विरोधकांनी जनतेत खोटा प्रचार करू नये, असेही ना. रामदास आठवले यांनी ठणकावून सांगितले.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर झालेल्या ५०० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक व्यवहाराच्या आरोपांवर बोलताना ना. रामदास आठवले यांनी जरांगे यांची बाजू घेतली. “मनोज जरांगे पाटील यांना ५०० कोटी रुपये दिले, असे म्हणणे पूर्णपणे अयोग्य आहे. त्या कथित ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. मनोज जरांगे यांचे आंदोलन संपवण्यासाठी भाजपने पैसे दिले अशा केवळ खोट्या चर्चा पसरवल्या जात असून, अशा प्रकारे कोणाचीही नाहक बदनामी करणे चुकीचे असल्याचे ना. रामदास आठवले यांनी नमूद केले.

ऐतिहासिक चवदार तळे सुशोभीकरण कामाची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी

महाड ( पुनित भावेकर)- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी चवदारतळे पाण्याचा सत्याग्रह करून इतिहास घडविला.त्याला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षात ऐतिहासीक चवदार तळयाचे सुशोभीकरण, जलशुद्धीकरण ; सौदर्यीकरणाचे काम चालु आहे. त्याची पाहणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी चवदारतळे येथे भेट देवुन केली.ना. रामदास आठवले यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास विनम्र अभिवादन केले. ऐतिहासीक क्रांतीभुमी असणा-या चवदारतळयाच्या सुशोभीकरण सौदर्यीकरण कामाची पाहणी त्यांनी केली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, रायगडचे संपर्क प्रमुख राहुलभाई सोनवले, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे, अमित मोरे, अमित तांबे, महाड रिपाइंचे तालुका अध्यक्ष मोहन तांबे आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.

आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत बोलताना ना. रामदास आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणे इतके सोपे नाही. संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा सत्यानाश केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. केवळ आंदोलन करून देशाची सत्ता बदलता येत नाही. सत्ता हवी असल्यास विरोधकांनी २०२९ मध्ये जनतेमध्ये जावे, लोकांचे मतपरिवर्तन करावे आणि मते मिळवून सत्तेवर यावे, असा सल्ला त्यांनी दिला. भारताचे कधीही ‘बांगलादेश’ होऊ देणार नाही, देशात डॉ. बाबासाहेबांचे संविधान कायम अमर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच गेल्या १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा मोठा विकास आणि कायापालट झाल्याचा दावा ना. रामदास आठवले यांनी केला.