विजेचा धोकाही समजला, हरित ऊर्जेचा मंत्रही मिळाला! महावितरणच्या अभियंत्यांनी घडवला ६.१९ लाख विद्यार्थ्यांशी संवाद

राज्यातील २,९१४ शाळांमध्ये विद्युत सुरक्षेचे धडे; अंध विद्यार्थ्यांसाठी आवाज, स्पर्श आणि गंधातून धोक्याची जाणीव करून देण्याचा अभिनव प्रयत्न

मुंबईWATCH TEAM : वीज आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे; पण तिचा निष्काळजीपणे वापर जीवावरही बेतू शकतो. विजेचा दिवा लावण्यापासून मोबाईल चार्ज करण्यापर्यंत रोजच्या जीवनात विजेचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिची सुरक्षितता, बचतीचे महत्त्व आणि हरित ऊर्जेची गरज समजावी, यासाठी महावितरणच्या अभियंत्यांनी थेट शाळांमध्ये पोहोचत प्रबोधनाची मोहीम राबवली. या उपक्रमातून राज्यातील २ हजार ९१४ शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील सुमारे ६ लाख १९ हजार विद्यार्थ्यांपर्यंत विद्युत सुरक्षेचा आणि हरित ऊर्जेचा संदेश पोहोचवण्यात आला.

वर्गखोलीत पोहोचले विजेच्या सुरक्षिततेचे धडे

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या महावितरणच्या अभियंत्यांनी यंदा विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला. अभियंता दिन आणि गणेशोत्सवाचे औचित्य साधून १५ ते ३० सप्टेंबरदरम्यान राबवलेल्या या अभियानात चित्रमय सादरीकरणे, माहितीपत्रके, पोस्टर्स, फ्लेक्स आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

वीज वाहिन्या, विद्युत उपकरणे आणि वीज वापरताना घ्यावयाची काळजी यांची माहिती सोप्या भाषेत देण्यात आली. विजेची निर्मिती कशी होते, ती घरापर्यंत कशी पोहोचते, वीज वाचवणे का आवश्यक आहे आणि हरित ऊर्जा भविष्यासाठी कशी महत्त्वाची आहे, याविषयीही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

सादरीकरणानंतर अनेक शाळांमध्ये प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन केले. काही शाळांमध्ये विद्युत सुरक्षेच्या विषयावर चित्रांमध्ये रंग भरण्याच्या स्पर्धाही घेण्यात आल्या. त्यामुळे सुरक्षा हा केवळ ऐकण्याचा विषय न राहता विद्यार्थ्यांच्या सहभागातून समजून घेण्याचा अनुभव ठरला.

अंध विद्यार्थ्यांसाठी संवेदनशील प्रात्यक्षिक

या संपूर्ण अभियानातील विशेष उल्लेखनीय उपक्रम पुण्यातील ‘द पुना स्कूल अँड होम फॉर द ब्लाईंड’ येथे राबवण्यात आला. दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना विद्युत अपघातांचे संभाव्य धोके समजावून सांगण्यासाठी अभियंत्यांनी आवाज, स्पर्श आणि गंध यांच्या माध्यमातून माहिती देण्याचा अभिनव प्रयत्न केला.

विद्युत सुरक्षेचा संदेश प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा, या दृष्टिकोनातून केलेल्या या प्रयत्नाने अभियानाला विशेष मानवी संवेदनशीलतेची जोड दिली. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनीही जळगाव येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रबोधन केले.

कोकण विभाग आघाडीवर; राज्यभरात व्यापक पोहोच

या अभियानांतर्गत विविध प्रादेशिक विभागांमध्ये पुढीलप्रमाणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात आले.

  • कोकण विभाग : ९४६ शाळा; सुमारे २ लाख १४ हजार विद्यार्थी
  • नागपूर विभाग : ८९९ शाळा; सुमारे १ लाख ७१ हजार विद्यार्थी
  • पुणे विभाग : ८२७ शाळा; सुमारे १ लाख ६९ हजार विद्यार्थी
  • छत्रपती संभाजीनगर विभाग : २४२ शाळा; सुमारे ६५ हजार विद्यार्थी

या उपक्रमाच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार आणि कार्यकारी संचालक परेश भागवत यांनी पुढाकार घेतला.

सुरक्षिततेची जाणीव, ऊर्जाबचतीची सवय

विद्युत अपघात टाळण्यासाठी केवळ नियमांची माहिती पुरेशी नसते; तर दैनंदिन जीवनात सुरक्षित वर्तनाची सवय निर्माण होणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्याचबरोबर ऊर्जेचा काटकसरीने वापर आणि हरित ऊर्जेबाबतची जागरूकता भावी पिढीमध्ये रुजवणे आवश्यक आहे.

‘विकसित भारत २०४७’ या ध्येयाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऊर्जेचे महत्त्व समजावून सांगणाऱ्या या अभियानाचे शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून स्वागत झाले. महावितरणच्या अभियंत्यांनी तांत्रिक जबाबदारीपलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा केलेला हा प्रयत्न विद्युत सुरक्षा आणि ऊर्जा संवर्धनाबाबत जागरूक पिढी घडवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरतो.