खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या अरेरावी व लूटमारी विरोधात प्रवाशी घेणार आक्रमक पवित्रा…
आरवली सध्या एसटीच्या संख्येत घट झाल्याने खाजगी ट्रॅव्हल्स कंपनींना सुगीचे दिवस आले आहेत. मात्र या कंपनीच्या चालक वाहकाकडून प्रवाश्यांना चुकीची वागणूक मिळत असल्याचे समोर येत आहे. तसेच भरमसाठ तिकीट आकारून प्रवाशांची लूट केली जात आहे. बहुतांश ट्रॅव्हल्स च्या गाड्या या अनधिकृत रित्या व्यवसाय करत आहेत. तरीही एरव्ही सामान्य रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उचलणारा परिवहन विभाग व पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक व दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत. अनेकवेळा खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या चालक वाहकांकडून प्रवाशांना दमदाटी करणे, मारहाण करणे, तसेच भरमसाठ तिकीट आकारणे अशा अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. मात्र तरीही संबंधित विभागाकडून या ट्रॅव्हल्स कंपनींना अभय दिले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस असे प्रकार वाढत आहेत.
शुक्रवार दिनांक १७ मार्च रोजी संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथून दादरला जाण्यासाठी दोन महिला तीन वर्षांच्या लहान मुलींसोबत दादरला जाण्यासाठी जीवदानी ट्रॅव्हल्स च्या बस मध्ये बसल्या. सदर महिलेच्या पतिने आपली पत्नी व वयोवृद्ध आई यांना मुंबईची माहिती नसल्याने दादर ला उतरण्यास सहकार्य करण्याचे बजावले होते. मात्र सदर बस ही दादरला न जाता दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली. सदर महिलांनी बाजूच्या प्रवाशाला दादर कधी येईल याची चौकशी केली असता ही बस दादर मार्गे न जाता दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी बस मधील कर्मचाऱ्यांना याबाबत विचारले असता उद्धटपणा करत तुम्ही कुठे ही उत्तर आम्हाला विचारू नका असे सांगण्यात आले. सदर महिलांना दमदाटी करण्यात आली. अखेर या घाबरलेल्या महिलांना सकाळी साडेसहा वाजता बोरीवली येथे उतरण्यात आले .
मुंबईची माहिती नसणाऱ्या महिलांचा मोबाईल ही त्याचक्षणी बंद झाल्याने या महिला अजूनच घाबरल्या. त्यानंतर टॅक्सी ने या महिलांनी मुंबई सेन्ट्रल पर्यंतचा प्रवास केला. सदर घटनेचा खुपच मनस्ताप झाल्याने याबाबत आपण प्रादेशिक परिवहन विभागाला पत्र देणार असून अशा मुजोर खाजगी बसच्या चालक वाहक व मालक यांचेवर तात्काळ कारवाई करून अधिकृत रित्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीवर ही कारवाई करून अशी वाहतूक बंद करावी अशी मागणी करणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या त्या बस चालकावर कारवाई व्हावी यासाठी महिला आयोगालाही पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खाजगी बस चालकांची ही मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे. मात्र महाराष्ट्र् नवनिर्माण सेना ही मुजोरी खपून घेणार नाही. संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष घालावे अन्यथा मनसे स्टाईल दणका दिला जाईल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी दिला आहे .