विनायक जितकर
शाळेच्या विद्यार्थ्यांचे ४ थी जिल्हास्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश…
बिद्री (प्रतिनिधी) – विद्यामंदिर मजरे कासारवाडा येथील इयत्ता ४थीतील विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हास्तरावर घवघवीत यश संपादन केले असून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय परीक्षेत एकूण ७ विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले आहे.
या प्रज्ञाशोध परीक्षेत दर्शन चव्हाण, प्रणवी आरेकर, शिवम सुतार, श्रीतेज जितकर, जानवी घारे, विवेक चव्हाण, ईशिता वारके या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या यशामागे मार्गदर्शक व मुख्याध्यापक सुनिल कुदळे (सर) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच विशेष सहकार्य म्हणून साताप्पा शेरवाडे, रुपाली कुदळे व मेघा फराकटे यांचे योगदानही उल्लेखनीय आहे.
या यशानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी व ग्रामस्थांनी एकत्र येत या यशस्वी शिक्षकांचा व विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी बोलताना मुख्याध्यापक सुनील कुदळे म्हणाले ,आमच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध अभ्यास, शिक्षकांचे सखोल मार्गदर्शन आणि पालकांचा सकारात्मक सहभाग यांच्या जोरावर हे घवघवीत यश संपादन केले आहे. ही केवळ शाळेची नव्हे तर संपूर्ण गावासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आम्ही या यशाचा उपयोग पुढील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी करू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन तौंदकर, उपाध्यक्ष महेश वारके ग्रामपंचायत सरपंच योगिता वारके यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.