राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाला गैरहजर राहणार.
मुंबई : नवीन संसद भवनाचे उद्घाटन महामहीम राष्ट्रपती महोदया यांचे हस्ते व्हावे ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह इतर विरोधी पक्षांनी केली परंतु राष्ट्रपतींना या कार्यक्रमाला न बोलावता पंतप्रधानच नूतन वास्तूचे उद्घाटन करणार याचा अर्थ भाजपकडून राष्ट्रपती पदाचे महत्व कमी करण्याचा डाव आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.
नागरिकांचे मूलभूत अधिकाऱ्यांचे रक्षण करणे, लोक तांत्रिक व्यवस्थेचे संभाळ करणे व भारतीय सेनेचे सरसेनापती म्हणून कर्तव्य बजावणे हे राष्ट्रपती यांचे कर्तव्य भाजपला माहीत असताना सुद्धा त्यांना डावलून हे उद्घाटन प्रधानमंत्री च्या हस्ते करणे म्हणजे २०२४ ला होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची भाजपची तयारी आहे अशी टीका महेश तपासे यांनी केली आहे.
देशाच्या सर्वोच्च ठिकाणी बसलेल्या व्यक्तीचा हा अपमान आहे ही भूमिका राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांनी पक्षप्रमुख श्री शरद पवार साहेब यांना कळवली व त्यानंतर इतर विरोधी पक्षांप्रमाणेच राष्ट्रवादीचेही सर्व खासदारांनी सदर उद्घाटन समारंभास न जाण्याचा निर्णय घेतल्याचे महेश तपासे यांनी कळविले.