मानव कल्याणासाठी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचे अनुकरण काळाची गरज

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

१९ एप्रिल: महात्मा बसवेश्वर जयंती विशेष

महात्मा बसवेश्वर हे केवळ १२ व्या शतकातील एक संत नव्हते, तर ते एक थोर समाजसुधारक आणि क्रांतीकारक विचारांचे प्रणेते होते. ‘बसव’ किंवा ‘बसवण्णा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महामानवाचे कार्य आजही २१ व्या शतकात तितकेच सुसंगत आणि प्रेरणादायी आहे.

बालपण आणि क्रांतिकारी निर्णय कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी येथे इ.स. ११०५ मध्ये वीरशैव कुटुंबात बसवेश्वरांचा जन्म झाला. त्यांचा जन्म अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर झाला, ज्याला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानले जाते. बालपणापासूनच त्यांनी कर्मठ विधींना विरोध केला. वयाच्या ८ व्या वर्षी मुंज करण्यास नकार देऊन, “मला आधीच लिंगदीक्षा मिळाली आहे,” असे सांगत त्यांनी गृहत्याग केला आणि ते कुडलसंगम येथे शिक्षणासाठी गेले. तेथे १२ वर्षे वास्तव्यास असताना त्यांनी विविध भाषा, धर्म आणि तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला.

लोकशाही संसदेचे जनक अभ्यासानंतर ते सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे आले. येथे त्यांनी ‘अनुभव मंटप’ नावाची एक लोकशाही संसद स्थापन केली. ही जगातील पहिली संसद मानली जाते, जिथे सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र बसून सामाजिक प्रश्नांवर चर्चा करत असत. समता, न्याय, बंधुता आणि पारदर्शक प्रशासन ही त्यांच्या लोकशाहीची मुख्य तत्त्वे होती. आजच्या संविधानातील अनेक मूल्यांची मुळे बसवेश्वरांच्या विचारात आढळतात.

समता आणि स्त्री-मुक्तीचा लढा त्या काळात स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जात असे. बसवेश्वरांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यासाठी मोठे कार्य केले. त्यांनी जातीभेद पूर्णपणे नाकारला. १२ व्या शतकात त्यांनी पुढाकार घेऊन घडवून आणलेला आंतरजातीय विवाह हा तत्कालीन समाजव्यवस्थेला आणि राजसत्तेला हादरवून टाकणारा क्रांतिकारी निर्णय होता.

राजकीय पुढाऱ्यांसाठी आदर्श महात्मा बसवेश्वर कोणत्याही पदाचा लोभ नसलेले न्यायप्रिय व्यक्तिमत्व होते. आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. सत्तेचा वापर भ्रष्टाचारासाठी न करता, तो समाजहितासाठी आणि जनकल्याणासाठी करणे हीच बसवेश्वरांना खरी श्रद्धांजली ठरेल.

अक्षय्य तृतीया आणि निसर्ग संवर्धन यावर्षी १९ एप्रिलला अक्षय्य तृतीया, महात्मा बसवेश्वर जयंती आणि भगवान परशुराम जयंती असा त्रिवेणी संगम जुळून आला आहे. या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून पृथ्वी रक्षणाचा संकल्प करायला हवा. वृक्षांच्या संवर्धनातूनच मानवजातीला शुद्ध हवा आणि सावली मिळेल, जे प्रत्यक्ष देवकार्यासारखेच आहे.

महात्मा बसवेश्वरांचे ‘कायकवे कैलास’ (कष्ट हाच कैलास) आणि समतेचे विचार अंगीकारून आपण एक आदर्श समाज घडवूया.

— रमेश कृष्णराव लांजेवार (स्वतंत्र पत्रकार), नागपूर. ९९२१६९०७७९

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.