गडहिंग्लज, आजरा, उत्तुर भागातील मुलींनी लसीकरण करून घ्यावे…
कोल्हापूर – जिल्ह्यातील 9 वर्षे पूर्ण झालेल्या मुली ते अविवाहित 26 वर्षापर्यंतच्या मुलींना एचपीव्ही लसीकरण गरजेचे आहे. तोंडाचा, स्तन व गर्भाशय पिशवीचा कर्करोग रोगाचा प्रमाण अधिक आहे. एचपीव्ही लसीकरणाने मुलींना सक्षम व आरोग्यदायी कॅन्सर मुक्तीसाठी प्रयत्न करूया, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
गडहिंग्लज नगरपरिषदेच्या छत्रपती शाहू सभागृहात आयोजित एचपीव्ही(HPV) लसीकरणाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. श्री. मुश्रीफ म्हणाले, देशात दर 8 मिनिटांनी एक महिला गर्भाशयांच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडत असून हे थांबायला हवे. या कर्करोग मुक्तीसाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) प्रतिबंधक लस ही मुली व महिलांसाठी आरोग्यदायी आहे. मुलींच्या शरीरावर, प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. कागल तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. गडहिंग्लज, आजरा, उत्तुर भागातील मुलींनी लसीकरण करून घ्यावे, शिक्षक पालकांनी शंका निरसन करून लसीकरणासाठी आवाहन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
यावेळी अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी एकनाथ काळवडे, गडहिंग्लज तहसीलदार ऋषिकेत शेळके, आजरा तहसीलदार समीर माने,गडहिंग्लज मुख्याधिकारी देवानंद डेकळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गीता कोरे, उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लजचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत खोत तसेच वैद्यकीय, महसूल व शिक्षण विभागाचे अधिकारी व तालुक्यातील मुख्याध्यापक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमावेळी अधिष्ठता डॉ.मोरे व यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देशमुख यांनी कर्करोगमुक्तीसाठी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) प्रतिबंधक लस विषयी माहिती देताना उपस्थितांचे शंका निरसन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश पाटील व स्वागत किरण कदम यांनी केले.