सरकारच्या परवानगीशिवाय कर्नाटक सरकार सोलापूरकरांचे पाणी पळवतेय; पॉईंट इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून जयंत पाटलांचा गंभीर आरोप…
मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या संमतीशिवाय कर्नाटक सरकार सोलापूर शहरातील पिण्याच्या पाण्याचा साठा पळवत आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पॉईंट इन्फॉर्मेशन माध्यमातून सभागृहात केला.
सीमाभागातील पाणीसाठ्यात ५७० एचपीचे तीन नवीन पंप टाकून पाणी उपसा केला जात आहे. अशाप्रकारे बाजूचे राज्य पाणी पळवत असेल तर याचा त्रास सोलापूर शहराला होईल. त्यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने पहावे अशी विनंती जयंत पाटील यांनी सरकारला केली. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आणि लक्षवेधीच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी आज सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
टेंभू योजनेसाठी गेली २७ वर्षे लोकांचा लढा सुरू आहे. सर्वात जास्त अडचणी या योजनेला आल्या आहेत. तासगाव, खटाव, माण, पंढरपूर, खानापूर, आटपाडी येथील काही गावांमध्ये या योजनेचे काम बाकी आहे. या कामांना आणखी २४-२५ वर्ष लागता कामा नये म्हणून या योजनेला प्रधानमंत्री सिंचन योजनेत सहभागी करून २ वर्षाचा टाईम बाऊंड कार्यक्रम आखून ही योजना पूर्ण करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित केली. मागच्या काळात जलसंपदा मंत्री असताना या भागाला अतिरिक्त ८ टीएमसी पाणी देऊ केले होते. त्याची डिझाइन पूर्ण आहे. त्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. बजेटमध्ये विशेष बाब म्हणून तरतूद करावी अशी सूचनाही जयंत पाटील यांनी केली.
संशोधक विद्यार्थी कृती समिती यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आदिछात्रवृत्ती अंतर्गत सर्व पात्र ८६१ विद्यार्थ्यांना सरस गट फेलोशिप मंजूर करण्याच्या मागणीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने बार्टी प्रशासनाने पत्राद्वारे लवकरात लवकर आदेश निर्गमित करावा अशी मागणी जयंत पाटील यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे सभागृहात केली.
सध्या राज्यात बेदाणा दरात मोठी घसरण होत आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादक व बेदाणा उत्पादक शेतकरी या दराच्या घसरणीमुळे हवालदिल झालेला आहे ही गंभीर बाबही जयंत पाटील यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
बाजारात बेदाण्याच्या मागणीपेक्षा आवक जादा होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम बेदाण्याच्या दरावर झाला आहे. पंधरा दिवसांत प्रति किलोस ४० रुपयांनी दर घटले असल्याने बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना त्याची झळ बसू लागली आहे. बेदाण्याचा समावेश हा राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणाऱ्या पोषण आहारात केला तर राज्यातील द्राक्ष व बेदाणा उत्पादकांना दिलासा मिळेल. त्यावर सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी सूचनाही जयंत पाटील यांनी सरकारला केली.