चिपळूणात पट्टेरी वाघाच्या कातड्याची तस्करी, तिघे ताब्यात
संगमेश्वर /सत्यवान विचारे
चिपळूण येथे पूर्ण वाढीच्या पट्टेरी वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या तिघांना चिपळूण वनविभाग व दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी (३० डिसेंबर) सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घोणसरे (ता. चिपळूण) येथील चिवेली फाटा येथे केली. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हेमंत भिकू रामाणे (४६, रा. आड, बंदरवाडी, म्हसळा, रायगड, सध्या रा. नवरत्न चाळ, त्रिमूर्ती, टाटा पवार कॉलनी, बोरिवली ईस्ट), दिनेश लक्ष्मण तांबीकर, (४८, रा. बामणोली, पूर्व तांबेवाडी, चिपळूण), आशितोष मुकुंद धारसे (२२, रा. मोटवली, राऊतवाडी, महाड) या तिघांना ताब्यात घेतले आहे. रामपूर नियतक्षेत्रातील घोणसरे येथील चिवेली फाटा येथे काहीजण वन्यप्राण्यांची कातडी अवैध तस्करी व विक्रीच्या उद्देशाने घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे वन विभाग व दहशतवादविरोधी पथकाने सापळा रचला होता. त्या ठिकाणी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान संशयितरीत्या वावरणाऱ्या तिघांकडे चौकशी केली.
त्यांनी तपासणी करताना माहिती देण्यास टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे असणाऱ्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये पट्टेरी वाघाचे कातडे मिळाले. या तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, विभागीय वनअधिकारी दि. पो. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. या संयुक्त कार्यवाहीमध्ये दहशतवादविरोधी पथकाकडून पोलिस उपनिरीक्षक व्ही. के. नरवणे, वनपाल डी. आर भोसले, गुहागरचे वनपाल एस. व्ही. परशेट्ये, रामपूरचे वनरक्षक शिंदे, आबलोलीचे वनरक्षक डुंडगे, रानवी वनरक्षक मांडवकर यांच्यासह दहशतवादविराेधी पथकाच्या अंमलदारांनी सहभाग घेतला हाेता.
वनविभाग व दहशतविराेधी पथकाच्या कामगिरीचे काैतुक करावे तितके कमीचः POSITIVE WATCH