आंतरराज्य–आंतरजिल्हा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी संबधित यंत्रणांनी लक्ष देणे गरजेचे – अमोल येडगे
आगामी विधानसभा निवडणूक 2024 अनुषंगाने
कोल्हापूर :- आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक- 2024 चे अनुषंगाने आंतरराज्य – आंतरजिल्हा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी संबधित यंत्रणांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आंतरराज्य – आंतरजिल्हा कायदा व सुव्यवस्था, आढावा बैठकीत केले. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक- 2024 चे अनुषंगाने कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदूर्ग व कर्नाटकातील बेळगाव जिल्हा प्रशासनांसोबत आढावा सभा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजर्षी शाहुजी सभागृहात पार पडली.
बैठकीस सांगली जिल्हाधिकारी डॉ .राजा दयानिधी, रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह, सिंधुदूर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील, बेळगाव जिल्हाधिकारी महंमद रोशन, कोल्हापूर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, सांगली पोलीस अधिक्षक संदीप घुगे, रत्नागिरी पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, सिंधुदूर्ग पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल व बेळगाव पोलीस अधिक्षक भिमाशंकर गुलेद यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, जिल्हयातील सर्व 10 विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क व प्रादेशिक परिवहन अधिकारी इत्यादी प्रशासनातील प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष व दृकश्राव्य प्रणाली (VC) द्वारे उपस्थित होते.
बैठकीत जिल्हाधिकारी येडगे यांनी मागील लोकसभा निवडणूक -2024 तसेच पूरपरिस्थिती दरम्यान योग्य तो समन्वय साधून उत्कृष्ठ कार्य केलेबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक-2024 अनुषंगाने आंतरराज्य तसेच आंतरजिल्हा तपासणी नाके उभारणी, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने (मद्य तस्करी, रोख रक्कमेची वाहतूक, गुन्हेगारांचे हस्तांतरण इत्यादी) सर्व उपाययोजनांबाबत विस्तृतपणे चर्चा करण्यात आली.आचारसंहिता घोषित होताच आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीबाबत पुढील आढावा सभा घेणेत येईल याची सर्वांना कल्पना दिली.
आंतरराज्य – आंतर जिल्हा हद्दीच्या ठिकाणी FST, SST, VST, VVT पथकांमध्ये परस्पर समन्वय साधणेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात दोन टप्यात विधानसभा निवडणुक झाल्यास लगतच्या जिल्हयांत करावयाची कार्यवाही, संयुक्त भरारी पथके तसेच प्रत्यक्ष मतदानादिवशी करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.