मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना मानाचे पान देणारे आणि म्हणूनच”क्रीडा पानाचे जनक” म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक वि. वि. करमरकर यांचे सोमवारी सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. अंधेरी येथे पारशीवाडा स्मशानभूमी, अंधेरी पूर्व येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
१९६० च्या आधी मराठी दैनिकांमध्ये खेळांच्या बातम्यांना प्रमुख स्थान नव्हते. ते करमरकर यांनी मिळवून दिले. यासाठी एक पूर्ण पान तयार करून खेळांची आवड असणाऱ्या वाचकांची भूक त्यामधून त्यांनी पूर्ण केली. १९६२ मध्ये महाराष्ट्र टाइम्स सुरू झाल्यानंतर या दैनिकाच्या पहिल्या टीममध्ये करमरकर यांचा सहभाग होता. द्वा.भ.कर्णिक संपादक असलेल्या या दैनिकात सुरुवातीला आधी दोन कॉलममध्ये क्रीडा जगताच्या बातम्या येत असत.करमरकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे कालांतराने संपूर्ण पान खेळांच्या पानाला मिळाले.
संपूर्ण मराठी दैनिकांच्या जगतात हा प्रयोग पहिल्यांदा झाला आणि वाचकांनी त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यामुळे नंतर राज्यात इतर दैनिकांनी सुद्धा एक पूर्ण पान खेळांच्या बातम्यांना देण्याचा निर्णय घेतला. यामुळे खेळांची आवड असणाऱ्या पत्रकारांना यामुळे पूर्ण वेळ नोकऱ्या उपलब्ध झाल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ज्येष्ठ पत्रकार वि.वि. करमरकर यांना श्रद्धांजली
मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला
मराठी क्रीडा पत्रकारितेचा दीपस्तंभ निमाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ क्रीडा समीक्षक,पत्रकार वि.वि.करमरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, दिवंगत करमरकर यांनी क्रीडा जगताला वृत्तपत्रात हक्काचे स्थान मिळवून दिले. त्यांनी वृत्तपत्रांत क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसाठी स्वतंत्र पान सुरू करण्यात पुढाकार घेतला. या अर्थाने ते मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक ठरले.त्यांनी क्रीडा क्षेत्रातील इंग्रजी शब्दांना सोपे आणि लक्षवेधी असे मराठी प्रतिशब्द मिळवून दिले. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील. करमरकर यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्येष्ठ क्रीडा समीक्षक, पत्रकार वि.वि. करमरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

परिणामी खेळ, खेळाडू, संस्था, क्रीडा संघटक आणि कार्यकर्ते यांच्या सततच्या प्रयत्नांची धडपड ठळकपणे लोकांसमोर आली. या सर्वांचे निर्माते करमरकर असल्याने ते क्रीडा पानाचे जनक म्हणून ओळखले गेले. विशेष म्हणजे मटाचे क्रीडा पान त्यांनी इतके लोकप्रिय केले की पहिल्या पानावर एक नजर टाकली की वाचक थेट मागच्या खेळांच्या पानावर जात. आपली आवड पूर्ण झाली की मग आतल्या पानावर नजर टाकत. राज्यभरातल्या वाचकांच्या सर्व्हेमधून ही बाब ठळकपणे समोर आली होती.करमरकर यांच्या क्रीडा पानाच्या यशात त्यांच्या सहकाऱ्यांचा सुद्धा मोठा वाटा होता. एक टीम उभी राहताना संघ नायक जितका महत्वाचा असतो, तितकेच त्यांचे सहकारी सुद्धा बिनीचे शिलेदार असतात. यामुळे टीमचे यश ठळकपणे समोर येते. करमरकर यांना आ.श्री. केतकर, वसंत भालेकर, चंद्रशेखर संत, सुहास फडके, प्रवीण टोकेकर, शरद कद्रेकर, संजय परब यांची तितकीच तोलामोलाची साथ मिळाली होती, हे विशेष!