विनायक जितकर
महाडिक वसाहत अंतर्गत घाटगे कॉलनी, शिवराज कॉलनी, युनिक पार्क येथील रस्ते डांबरीकरण, गटर्स व पॅसेज कॉक्रिटीकरण कामाच्या प्रारंभ…
कोल्हापूर : पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी आणला होता. मात्र, आमचे विरोधक या निधीला स्थगिती मिळावी यासाठी आपली ताकद वापरत आहेत. याऐवजी त्यांनी विकास कामात ईर्षा करावी आणि कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ज्यादा निधी आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले.
कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १८ महाडिक वसाहत अंतर्गत घाटगे कॉलनी, शिवराज कॉलनी, युनिक पार्क येथील रस्ते डांबरीकरण, गटर्स व पॅसेज कॉक्रिटीकरण कामाच्या प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. आमदार जयश्री जाधव प्रमुख उपस्थित होत्या. पालकमंत्री म्हणून काम पाहताना शहराच्या विकासासाठी विविध प्रकल्प प्रस्तावित केले होते. या प्रस्तावित कामांचा निधी रद्द करण्याऐवजी कोल्हापूर शहरात आणखी कोणती नवीन विकास कामे आणता येतात, याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले. सरकारे येतात जातात. त्यातून जनतेच्या हिताच्या कामांना स्थगिती देणे किंवा ती रद्दच करणे चुकीची आहे.
आपण जनसेवक आहोत आणि जनतेच्या कामाला प्राधान्य दिलेच पाहिजे असे मत आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केले. स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर म्हणाले, शिंदे – फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या काळातील विकासकामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, न्यायालयाने विकासकामांवरील स्थगितीचे आदेश रद्द केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने मंजूर केलेल्या आणि शिंदे सरकारने स्थगिती आणलेल्या सर्व कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, माजी नगरसेवक तौफिक मुल्लांनी यांनी मनोगत व्यक्त केले. आसिफ फरास, भीमराव पवार, माजी नगरसेवक महेश जाधव, विशाल चव्हाण, कैलास गौडदाब, दीपक शेळके, अनिल कारंडे, विक्रम घाटगे, अमोल शेंडगे, तात्या पाटील, संपत चौगुले, शिवाजी कांबळे, निलेश भोसले यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.