प्लास्टिक मुक्त यात्रा साजरी करुन पर्यावरणाचे रक्षण करुया… भाविकांनी प्लॅस्टिकच्या पिशवी ऐवजी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा…
कोल्हापूर – श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे होणारी चैत्री यात्रा प्लास्टिक मुक्त होण्यासाठी भाविक, व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी) येथे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्लॅस्टीक वापरावर बंदी घालण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी पन्हाळा, शाहूवाडी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा तहसीलदार माधवी जाधव, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक धैर्यशील तिवले, उप अभियंता सुयश पाटील, ग्रामसेवक शिवाजीराव पाटील तसेच जोतिबा डोंगरावरील व्यापारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, जोतिबा डोंगरावर प्लास्टिकमुळे पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी व्यापारी, यात्रेकरु, नागरिकांनी डोंगरावर कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकचा वापर करु नये. यात्रेसाठी चिरमुऱ्याचे पॅकिंग मोठ्या प्रमाणावर झाले असल्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी चुरमुरे वगळता अन्य सर्व वस्तू, देवाचे पूजा साहित्य, मिठाई, पेढे तसेच खाद्यपदार्थांचे तसेच खेळणी व अन्य साहित्यांचे पॅकींग प्लॅस्टिकचे असणार नाही याची दक्षता घ्यावी. यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांनी डोंगरावर येताना कोणत्याही वस्तूंसाठी प्लॅस्टिकच्या पिशवी ऐवजी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करावा, यासाठी सोबत कापडी पिशव्या ठेवाव्यात. अन्न, पाणी, फराळाच्या वस्तू दान करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनीही प्लॅस्टिकचा वापर करु नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ग्रामपंचायतीने बचत गटाच्या माध्यमातून व्यापारी, भाविकांना कापडी पिशव्या उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच पुजाऱ्यांच्या घरी कापडी पिशव्या देण्यासाठी नियोजन करा. सर्वांनी सकारात्मक विचाराने सहकार्य करुन जोतिबा डोंगरावरील यात्रा प्लास्टिक मुक्त पद्धतीने पार पाडून पर्यावरणाचे रक्षण साधावे, असे ते यावेळी म्हणाले. उपविभागीय अधिकारी शिंगटे व सचिव शिवराज नाईकवाडे यांनी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी प्लास्टिक मुक्त यात्रा होण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.