मडूर येथे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीच्या कामाचा शुभारंभ…

पशुपालकांना मिळणार अत्याधुनिक सुविधा; परिसरात समाधानाचे वातावरण

गारगोटी वार्ताहर – पालकमंत्री प्रकाश आबिटकर व जिल्हा परिषद सदस्या रोहिणी अजुन आबिटकर यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या ७६ लाख रुपयांच्या मडूर (ता.भुदरगड) येथील नवीन पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकामाचा शुभारंभ प्रा.अर्जुन आबिटकर, बाबा नांदेकर व सभापती विक्रम पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना प्रा. अर्जुन आबिटकर म्हणाले की, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पशुधनाचे आरोग्य जपणे हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शासनाच्या माध्यमातून अशा पायाभूत सुविधांसाठी सातत्याने निधी उपलब्ध करून दिला जात असून, काम दर्जेदार व विहित वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी संबंधित यंत्रणेला केले. नवीन इमारतीमुळे जनावरांवर उपचार, लसीकरण, कृत्रिम रेतन, औषध साठवणूक तसेच तपासणी या सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध होतील. प्रशस्त उपचार कक्ष, औषध भांडार, कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था आणि जनावरांना सुरक्षितपणे हाताळण्यासाठी आवश्यक सोयी या इमारतीत असतील, अशी माहिती दिली. पशुपालकांनी या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. “आमच्या जनावरांसाठी चांगली सोय होणार असल्याने आता वेळेवर उपचार मिळतील,” अशी प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांनी दिली.

यावेळी युवानेते बाबा नांदेकर, सभापती विक्रम पाटील, उपसभापती अरुणा देसाई, पंचायत समिती सदस्या कल्याणी फगरे, सदस्य सुनील किरोळकर, सरपंच जयसिंग सुतार, माजी सभापती सुनील निंबाळकर, जयवंतराव चोरगे, सात्तापा कल्याणक र,विष्णू मोरे, सुरेश पाटील, धनाजी चोपडे, शरद कासार, विश्वास रणदिवे, शंकर राणे, रघुनाथ फगरे, डॉ.बी.एस.करे, राजश्री सुतार, उज्वला जाधव यांच्यासह प्रमुख मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक मुस्तकीम काझी यांनी केले तर आभार युवराज फगरे यांनी मानले. फ़ोटो- मडूर (ता.भुदरगड) येथील नवीन पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकामाचा शुभारंभ करताना जिल्हा परिषद सदस्या रोहिणी अजुन आबिटकर उपस्थित, प्रा.अर्जुन आबिटकर, बाबा नांदेकर व सभापती विक्रम पाटील, उपसभापती अरुणा देसाई आदि मान्यवर होते.