“वाचू आनंदाने” उपक्रमाला चिपळूणकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नगर परिषद, लोकमान्य टिळक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयांचा स्तुत्य उपक्रम
चिपळूण – मोबाईलच्या आहारी गेलेल्या नव्या पिढीला पुन्हा पुस्तकांकडे वळवण्यासाठी चिपळूण नगर परिषदेने सुरू केलेल्या “वाचू आनंदाने” या उपक्रमास रविवारी श्री देव गांधारेश्वर मंदिर परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध, पालक, अधिकारी आणि नागरिक असे सगळेच दोन तास वाचनात रमले.
या उपक्रमाची सुरुवात ग्रंथपूजनाने करण्यात आली. साहित्यिक व संशोधक प्रकाश देशपांडे, लोकमान्य टिळक वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, मुख्याधिकारी विशाल भोसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट करताना सांगितले, “वाचनामुळेच कलेक्टर होता येतं. वाचन ही केवळ सवय नाही, ती एक संस्कृती आहे.”प्रसिद्ध साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी वाचनसंस्कृतीचे महत्त्व समजावले आणि नव्या पिढीला मोबाइलच्या आहारी न जाता पुस्तकांशी मैत्री करण्याचे आवाहन केले.
प्रेरणादायी क्षण:
कार्यक्रमात सहभागी झालेल्या महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थिनीने “मोबाईलपेक्षा पुस्तक वाचून खूप आनंद झाला” अशी भावना व्यक्त करत उपक्रमाचे यश अधोरेखित केले.
प्रशासकीय अधिकाऱ्यांचाही सहभाग:
प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रविण लोकरे यांनी स्वतः वाचनात सहभागी होत उपस्थितांना प्रेरणा दिली. “वाचनामुळेच मी घडलो. एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आलो, ते वाचनाच्या बळावर,” असे सांगताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे उद्गार कौतुकाने ऐकले.
वाचनालयांचा पुढाकार:
शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करणाऱ्या लोकमान्य टिळक वाचनालय आणि रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या सहकार्याने हा उपक्रम आकाराला आला आहे. ग्रंथपाल भोसले, सोमण आणि कर्मचाऱ्यांनी पुस्तक व्यवस्थापन आणि निवडीत विशेष मेहनत घेतली.
उत्कृष्ट नियोजन आणि सहकार्य:
मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, बापू साडविलकर यांनी उत्तम नियोजन केले. नगर परिषद कर्मचारी, वाचनालये आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रत्येक रविवारी ‘वाचनाचा महाउत्सव’:
दर रविवारी सकाळी ८ ते १० या वेळेत विविध ठिकाणी हा उपक्रम घेण्यात येणार असून, पुढील वाचन उपक्रम दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी साने गुरूजी उद्यान, चिपळूण येथे होणार आहे.
—
नगर परिषद व वाचनालयांमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, या सुंदर उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे आणि वाचन संस्कृतीला बळ द्यावे.