श्री अंबाबाई मंदिरातील विविध विकास कामांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार शुभारंभ
*केंद्रीय व राज्यातील विविध मंत्र्यांची राहणार उपस्थिती
कोल्हापूर TEAM WATCH : पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग व परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा शुभारंभ शनिवार, २० जून रोजी सकाळी होणार आहे. हा शुभारंभ केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल. महाराष्ट्र शासनाच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व करवीर निवासिनी श्री अंबाबाई विकास आराखडा अंतर्गत हा विकास प्रकल्प राबवला जात आहे. नवीन प्रदक्षिणा मार्गामुळे भाविकांना मंदिर प्रदक्षिणा करताना अधिक सुविधा, सुसज्जता आणि सुरक्षितता उपलब्ध होणार आहे. तसेच परिवार देवता मंदिरांचे संवर्धन व सुशोभीकरण केले जाणार आहे.
यावेळी, सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, ग्रामविकास मंत्री विजयकुमार गोरे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले , नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा सह पालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह स्थानिक खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर केंद्रीय गृह व सहकार मंत्री यांची कोल्हापूर येथे राजकीय सभा तसेच इचलकरंजी येथे सहकारी बँकेचा कार्यक्रम व राजकीय सभा होणार आहे.






































































