महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात
इचलकरंजी शहरात सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा
इचलकरंजी महापालिका अंतर्गत सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात शाळा सुरु होण्यापूर्वी गणवेश व शालेय साहित्य वाटप करावे. तसेच त्यांना उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना प्रधान सचिव विकास खारगे यांनी दिल्या.इचलकरंजी महानगर पालिका प्रशासन व आम्ही इचलकरंजीकर अधिकारी ग्रुप यांची समन्वय बैठक मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतच संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रांत अधिकारी विकास खरात, तहसीलदार कल्पना ढवळे, आयुक्त तथा प्रशासक सुधाकर देशमुख, प्र.उपायुक्त केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापुरे, कार्यकारी अभियंता संजय बागडे, कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुनिलदत्त संगेवार, नगर रचनाकार रणजित कोरे, विद्युत अभियंता संदीप जाधव, प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासक अधिकारी नम्रता गुरसाळे, आम्ही इचलकरंजीकर अधिकारी ग्रुपचे अध्यक्ष उल्हास पुजारी, विनायक जाधव, सोमनाथ रसाळ, इम्रान नाईकवडे, निखिल दोपरे उपस्थित होते.
खारगे इचलकरंजी महापालिकेने महापालिकेच्या अंतर्गत सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये सर्व शालेय सोयीसुविधा उपलब्ध करून दद्याव्यात. एक ही विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
इचलकरंजी महानगरपालिकेचे काही विकासात्मक प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी प्रलंबित असतील तर त्याबाबतची सविस्तर माहिती द्यावी. सर्व प्रस्ताव त्वरित मंजूर होण्यासाठी प्रयत्न करून इचलकरंजी महापालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत असे सूचना श्री. खारगे यांनी इचलकरंजी महापालिका प्रशासन व आम्ही इचलकरंजी ग्रुपच्या सदस्यांना दिल्या.
इचलकरंजी शहरातून राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत यासाठी सर्व सोयी सुविधानी परिपूर्ण असे क्रीडा संकुल असावे याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. तसेच संपूर्ण इचलकरंजी शहर ‘हरित शहर’ होण्यासाठी महापालिकेसह सर्व नागरिकांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना श्री. खारगे यांनी करून शहराचा वृक्ष नियोजन आराखडा सादर करण्याचे निर्देशित केले. घनकचरा व्यवस्थापन करून शहर पूर्णपणे स्वच्छ राहील याबाबत दक्षता घ्यावी असेही त्यांनी सुचित केले.
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्री. खारगे यांनी इचलकरंजी महापालिकेच्या विविध प्रलंबित प्रश्नांची माहिती घेतली. तसेच विविध विकासात्मक कामांना गती देण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या. आम्ही इचलकरंजी ग्रुपने ही इचलकरंजी महापालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन खारगे यांनी केले.
- यावेळी शहराच्या पुढील विषयांवर विविध क्षेत्रातील विकासाकरिता नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शाहू हायस्कूल आणि विद्या निकेतन शाळेत आवश्यक सुविधांबाबत महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतुदी करण्यात आल्या असून आधुनिक पद्धतीचे बेंच डिजिटल बोर्ड शासनाकडून मिळण्याची मागणी आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केली.
शहरातील गरजू, गरीब विद्यार्थ्यांना नियमित व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा याकरिता रविंद्रनाथ टागोर वाचनालयाच्या सध्याच्या इमारतीवर दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाची मागणी इचलकरंजीकर ग्रुपच्या सदस्यांनी केली. यावर शासनाकडे मागणी करण्यात येईल, असे आयुक्त देशमुख यांनी सांगितले.
आम्ही इचलकरंजीकर अधिकारी ग्रुपच्यावतीने सोमनाथ रसाळ यांनी शहरातील विकासाकरिता राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांकरिता सर्व सामाजिक व स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्याकरिता एक बैठक आयोजित करण्याची विनंती केली, यावर लवकरच अशी बैठक घेण्याचे नियोजन करु, असे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.संघटनेचे अध्यक्ष उल्हास पुजारी यांनी समन्वय बैठकीचे प्रास्ताविक केले. त्यानंतर आयुक्त सुधाकर देशमुख यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे यांचे महापालिकेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.