आणखी तासाभरात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेडची बहुचर्चित उत्तरसभा सुरू होईल. ही सभा ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यासाठी आणि एकंदरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची असणार आहे. कारण पाच मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी याच मैदानावर मोठी सभा घेतली होती. या सभेला प्रत्युत्तर म्हणून आणि या भागातील आपली ताकद, आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी रामदास कदम यांनी आजच्या रेकॉर्डब्रेक सभेची घोषणा केली होती. आता घोडा मैदान अगदी जवळ आले आहे. सभा किती मोठी होते, त्यात किती उत्साह आहे, भाषणे किती जोरदार आणि प्रभावी होतात हे थोड्याच वेळात कळेल. एकंदर कोकणातील आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आपलेपणा निर्माण करण्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यश येते अथवा न येते याचाही फइस्ला होईल.
![]() |
खरं तर उद्धव ठाकरेंची सभा काय किंवा आज होणारी मुख्यमंत्री शिंदे यांची सभा काय हा राजकीय शिमग्याचा प्रकार आहे हे कोणी नाकारू शकत नाही. सर्वसामान्य कोकणी माणसाला भावनांच्या भुलभुलैयात अडकवायचे आणि स्वतःचे राजकीय उखळ पांढरे करून घ्यायचे, खुंटे हलवून बळकट करून घ्यायचे हाच मुख्य उद्देश आहे. मात्र असे असले तरी ही सभा केवळ राजकीय प्रत्युत्तररासाठी नाही तर कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी, कोकण विकासाच्या योजनांची घोषणा करण्यासाठी, येथील प्रश्न प्राधान्याने सोडविण्याच्या दृष्टीने मार्ग शोधणारी असेल अशी ग्वाही खुद्द सभेचे संयोजक रामदासभाई कदम आणि पालकमंत्री उदय सामंत पत्रकारांशी बोलताना सातत्याने देत आहेत.
त्यावर या घडीला तरी विश्वास ठेवला पाहिजे. लोकांचीही आता तीच अपेक्षा आहे. गुवाहाटी, खोके, गद्दार अशा मुद्द्यांची गुळगुळीत झालेली कॅसेट पुन्हा लावली जाऊ नये तर कोकण विकासाचे ठोस मुद्दे, उपाययोजना यावर अधिक भर द्यावा असे सर्वसामान्य लोकांना वाटते आहे. अर्थात ही सभा राजकीय आहे त्यामुळे ती अगदीच व्हेज होणार नाही. त्याला अस्सल कोकणी मसाल्याचा तडका असणार यात शंका नाही. पण केवळ राजकीय हिशोब पूर्ण करण्यासाठी ही सभा होऊ नये एवढी माफक अपेक्षा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून नक्कीच आहे.
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
९८५०८६३२६२
![]() |