कर्जाशी संबंध नसताना कसुरी कर्मचाऱ्यांनी दिल्या धमक्या वैतागून तरुणाने केली कार्यालयात नासधूस…
कोल्हापूर – पुण्यातील एका व्यक्तीने बजाज फायनान्सकडून आयफोन खरेदी केला होता, मात्र हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्याने फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नोंद केलेल्या मोबाईलनंबर वरती संपर्क साधला मात्र हा मोबाईल क्रमांक कोल्हापुरातील शाहूपुरी गावत मंडई परिसरात राहणाऱ्या अर्जुन कोरे या तरुणाचा असून अर्जुन याने या कर्जाशी माझा कोणताही संबंध नसल्याचे निदर्शनास आणून दिले तरीही फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यांकडून अर्जुनला वारंवार फोनवरून धमकी आणि अर्वाच्च भाषेत उचलून नेण्याची धमकी दिली.
यानंतर संतापलेल्या अर्जुन कोरे याने कोल्हापुरातील रेल्वे फाटक परिसरात असणाऱ्या बजाज फायनान्सचे कार्यालय गाठले आणि आपल्याला पुन्हा पुन्हा फोनवरून धमक्या देत असल्याचे सांगितले. यावेळी या कार्यकर्यातील कर्मचाऱ्यांनी पुणे कार्यालयाशी संपर्क साधून संबंधित तरुणाचा मोबाईल क्रमांक बदलण्यास सांगितले. मात्र याचवेळी कोरे याला पुन्हा पुण्यातून वसुली कर्मचाऱ्यांनी फोन करून धमकी देण्यास सुरवात केली. यावेळी संतापलेल्या कोरे याने कार्यलयातील साहित्याची तोडफोड करण्यास सुरवात केली. ज्या कर्जाशी माझा कोणताही संबंध नसताना मला धमक्या देऊन मानसिक त्रास का दिला जातोय ? असा सवाल करत त्याने कार्यालयातील साहित्य विस्कटून टाकले.
१५ दिवसांपूर्वीच अर्जुन कोरे याचे लग्न झाले आहे. मात्र वारंवार बजाज फायनान्स कडून येणाऱ्या धमक्यांनी त्रास होत असल्याचे यावेळी अर्जुन कोरे याने सांगितले. बीट दरम्यान याबाबतची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि माहिती घेतली. यावेळी पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणलं. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.