31 जुलै पर्यंत भाग घ्यावा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन…
कोल्हापूर – प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 हंगामात राज्य शासनाने शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्त्यात त्यांच्या पीकाचा विमा उतरविण्याची योजना जाहीर केली आहे. खरीप 2023 हंगामासाठी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक 31 जुलै 2023 पर्यंत भाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
या योजनेची अंमलबजावणी राज्यात निवडलेल्या 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून केली जात आहे. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर सामूहिक सेवा केंद्राच्या (CSC) माध्यमातून होत आहे. पीक विमा योजनेत सामूहिक सेवा केंद्राच्या (CSC) माध्यमातून झालेल्या नोंदणीसाठी शेतकऱ्यामागे प्रति 40 रुपये प्रमाणे रक्कम विमा कंपन्यांकडून सामूहिक सेवा केंद्र (CSC) चालकांना देण्यात येते. पीक विमा योजनेत नोंदणी करताना सामूहिक सेवा केंद्र (CSC) चालकांनी शेतकऱ्यांकडून विमा हप्त्यापोटी एक रुपया घेऊन त्यांच्याकडून इतर कोणतेही शुल्क न स्विकारता विमा योजनेत नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे.
पीक विमा नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता पोटी जमा करावयाच्या एक रुपया व्यतिरिक्त इतर कोणतीही रक्कम सामूहिक सेवा केंद्र चालकांकडे जमा करु नये. तसेच जवळचे सामूहिक सेवा केंद्र(CSC) चालक अशा प्रकारे जादा रक्कम घेऊन गैरवर्तणूक करत असेल तर त्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास कळवावे.