काेल्हापूर- TEAM WATCH – नवरात्रोत्सवाच्या काळात महालक्ष्मी (अंबाबाई) देवीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक कोल्हापुरात दाखल होतात. बाहेरून येणाऱ्या या भाविकांना शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था आणि नो-पार्किंग क्षेत्रांची पुरेशी माहिती नसते. अशा वेळी अनवधानाने चुकीच्या ठिकाणी वाहन उभे राहिल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे या उत्सवाच्या काळात भाविकांना वाहनतळांबाबत योग्य मार्गदर्शन करावे आणि दंडात्मक कारवाई ऐवजी सहकार्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती यांना देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी स्वीकारले.
बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी शहराच्या प्रमुख प्रवेशद्वारांवर आणि मार्गांवर वाहनतळांची माहिती देणारे दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने केवळ दंडात्मक कारवाईवर भर न देता भाविकांना योग्य दिशा दाखवून सहकार्य करावे, जेणेकरून कोल्हापूरची आदरातिथ्याची परंपरा अधिक समृद्ध होईल, असा सकारात्मक सूर या निवेदनातून मांडण्यात आला आहे.
यासोबतच, मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे भाविकांना प्रदक्षिणा घालताना येणाऱ्या अडचणी आणि परिसरातील इतर देवतांना तेल वाहण्यासाठी होणारा अडथळा दूर करून ते मार्ग खुले करावेत, अशीही विनंती प्रशासनाला करण्यात आली.
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, कृष्णात पोवार, अखिल भारत हिंदु महासभेचे मनोहर सोरप, पूजा शिंदे, भाजपचे एस्.बी. देवणे, शिवराष्ट्र धर्म संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष दिलीप भिवटे, हिंदुत्वनिष्ठ शशी बीडकर, सचिन भोसले, राजाराम कारखान्याचे संचालक सर्जेराव पाटील उपस्थित होते.
तसेच मंदिर महासंघाचे समन्वयक प्रसाद कुलकर्णी, संयोजक प्रमोद सावंत, सहसंयोजक अशोक गुरव, नरवीर शिवा काशिद यांचे १३ वे वंशज आनंदराव काशीद, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आणि हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे रामभाऊ मेथे उपस्थित होते.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.













































































