शिराळा आणि वाळवा तालुक्यात वन्य प्राण्यांचा वावर मानवी वस्तीमध्ये वाढला आहे. यामध्ये नागरिकांच्या सह पाळीव प्राण्यांवर हल्ले वाढले आहेत. यासह शेतीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. याबाबत तातडीने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त व्हावा आणि नुकसानग्रस्तांना जास्तीची नुकसान भरपाई मिळावी अशा आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी शिराळा तहसिलदार यांना दिले.
- तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिराळा व वाळवा तालुक्यातील अनेक गावामध्ये बिबट्या, रानगवे, रानडुक्कर, वानर, मोर, लांडोर इत्यादी प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी शेतीमधील पिकांचे सातत्याने खूपच नुकसान होत आहे.
- वारंवार पिकांचे नुकसान झाल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हाता तोंडाशी आलेलं पिक जंगली श्वापद नष्ट करीत असल्याने शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या त्रासाला नेहमीच सामोरे जावे लागत आहे.
- हे वन्य प्राणी, पाळीव जनावरे उदा. म्हैस, बैल, शेळी, मेंढ्या, कोंबड्या, पाळीव कुत्री इत्यादींवर हल्ले करून त्यांना ठार मारू लागले आहेत. काही ठिकाणी मनुष्यावर देखील हल्ले झाले आहेत. या प्रकारामुळे सर्व गावातील शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.
- शेतीचे नुकसान आणि नुकसानी पोटी मिळणारी तटपुंजी भरपाई यामुळे काही शेतकऱ्यांनी वैतागून नाईलाजास्तव आपल्या जमिनी पडीक ठेवल्या आहेत. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात अनेक किमती जनावरे पाळीव प्राणी दगावल्यामुळे पशुपालक भयभीत होऊन हैराण झाले आहेत.
सर्व बाबींचा शासनाकडून गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. वन विभागाकडून वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा. तसेच भरपाई पोटी मिळणाऱ्या रकमेत वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे. यापूर्वी आम्ही या संबधित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना समक्ष भेटून याबाबत लेखी तसेच तोंडी सविस्तर माहिती दिली आहेच. मात्र यावर अपेक्षेप्रमाणे कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सदर निवेदन आपणास देत आहोत. यातूनही दखल घेतली नाही तर आम्हास उग्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल. याबाबत आपण लक्ष घालावे व येथील गंभीर परिस्थितीची शासन स्तरावर जाणीव करून द्यावी. तसेच या अनुषंगाने स्थानिक पातळीवर योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय योजने संदर्भात संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांची व्यापक बैठक बोलवावी असे देखील या निवेदनात म्हंटले आहे.
बिबट्याचा धुमाकुळ सुरूच आठवड्यात चार शेळ्या फस्त. वनविभाग मात्र सुस्थच
यावेळी, बी. के. नायकवडी, विश्वास कदम, बंडा डांगे, यशवंत निकम, गजानन पाटील, सचिन यादव, सुनील कवठेकर, विजय पाटील, विजय महाडिक, वसंत पाटील, एस. के. पाटील, अरविंद बुद्रुक, माणिक पाटील, अमित कुंभार,शरद गुरव, रघुनाथ पाटील, विनोद कदम, सुशील गायकवाड, आनंदराव पाटील, पांडुरंग गायकवाड, उद्धव पाटील, संजय हिरवडेकर, शंकर पाटील, गजानन सोनटक्के, वैभव कांबळे, दिलीप पाटील, आनंदराव पाटील, प्रमोद पाटील, विजय थोरबोले, बाजीराव सपकाळ, संभाजी पाटील,शिवाजी खोत, राजू साळूखे यांच्यासह शिराळा वाळवा तालुक्यातील विविध गावातील सरपंच, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.