विनायक जितकर
महापालिकेचे लेखी आश्वासन १५ ते २० दिवसात नवीन टेंडर प्रक्रिया राबविणार
कचरा उठाव करणाऱ्या टिप्परचालकांना किमान वेतन मिळावे यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर गुरुवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस घंटानाद आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले होते, आणि सोमवार पासून काम बंद इशारा देण्यात आला होता.
यावर महापालिका प्रशासनासोबत ‘आप’ शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा होवून, ठेकेदारांची बिले काढण्याआधी पगारपत्रक तपासले जाईल, किमान वेतन दिले जाते का नाही हे बघितले जाईल, जे ठेकेदार किमान वेतन देत नाहीत त्यांचे कंत्राट रद्द केले जाईल, आणि कर्मचार्यांना किमान वेतन मिळेल याची हमी देणारे नवीन टेंडर येत्या १५ ते २० दिवसात काढू असे आश्वासन लेखी स्वरुपात शिष्टमंडळाला दिले.
त्यामूळे सोमवार पासून होणारे काम बंद आंदोलन मागे घेतल्याचे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाकडून लिखित स्वरूपात किमान वेतनाचे आश्वासन मिळाल्यामुळे टिप्पर चालकांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे.