मुसळधार पावसातही अल्पावधीतच घाटरस्ता मोकळा… प्रवाशांचे समाधान…
कोल्हापूर – मध्यरात्री साधारण 1.30 ची वेळ… देवगड-निपाणी-कलादगी या राज्य मार्गावर फोंडाघाटात झाड पडल्यामुळे वाहतूक कोंडी होवू लागली. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. अशावेळी या मार्गावरील वाहन चालकाने नियंत्रण कक्षाच्या १०० आणि १०१ क्रमांकावर संपर्क केल्यावर लगेचच उपअभियंता एस. बी. इंगवले, शाखा अभियंता एस. के. किल्लेदार, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्यासह पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी याठिकाणी पोहोचले. मुसळधार पावसातही प्रशासकीय यंत्रणेने कार्यतत्परता दाखवत पहाटे 3 वाजेपर्यंत रस्त्यावर पडलेले झाड हटवले आणि घाट मार्गातील वाहतूक सुरळीत सुरु झाली.
इतक्या मोठ्या मुसळधार पावसातही अल्पावधीतच घाटरस्ता मोकळा झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. या मार्गावरुन जाणाऱ्या आणि इथल्या वाहतूक कोंडीतून जलदगतीने बाहेर पडलेल्या एका ट्रॅव्हल्स च्या वाहनचालकानेही या कृतीची दखल घेत “धन्यवाद राधानगरी पोलीस, PWD department राधानगरी” असा संदेशही पाठवला.
अतिवृष्टी आणि पूरसदृश्य परिस्थितीत राधानगरी विभागाचे पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग व संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने जलदगतीने केलेल्या कामाचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कौतुक केले आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील सर्व यंत्रणेने सतर्क राहून नागरिकांना आवश्यक ती मदत तात्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या आहेत.