विनायक जितकर
विधान परिषदेत प्रश्नाद्वारे आमदार सतेज पाटील यांची नवसंजीवनी योजनेवर लक्षवेधी…
मुंबई – राज्यातील पूरप्रवण क्षेत्रातील गावांमध्ये नवसंजीवनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, या गावांना वेळेत धान्य पुरवठा करावा, अशी मागणी विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली.
विधान परिषदेत प्रश्नाद्वारे आमदार सतेज पाटील व अन्य सदस्यांनी नवसंजीवनी योजनेवर लक्ष वेधले. या योजनेद्वारे पूरप्रवण क्षेत्रातील गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी तीन महिन्यांचे धान्य पोहोचवण्याच्या आदेश शासनाने अन्य व नागरी पुरवठा विभागास दिले होते. मात्र अद्यापही या गावांना धान्याचा पुरवठा करण्यात आलेला नाही हे खरे आहे का? असल्यास याबद्दल काय कारवाई केली असे सवाल आमदार पाटील यांनी केले.
यावर उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले, नवसंजीवनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 22 मे 2019 च्या शासन आदेशानुसार क्षेत्रीय कार्यालयाना सूचना करण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत ११ जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीचे धान्य वितरित करण्यात आलेले आहे. उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात वाहतुकीची कोणती अडचण येत नसल्यामुळे सदर जिल्ह्यातील गावांना प्रचलित पद्धतीने धान्य पुरवठा होत आहे अशी माहिती त्यांनी दिली.