भारतातील कामगार संघटनाना आदर्श असणारे नुसी हे मॉडेल आहे.
समाजात कामगार कल्याणकारी योजना राबवणारी न्यूसी एक चांगली कामगार संघटना असून, भारतातील कामगार संघटनाना आदर्श असणारे नुसी हे मॉडेल आहे. असे स्पष्ट उद्गार महाराष्ट्र हिंदू सभेचे जनरल सेक्रेटरी साथी संजय वढावकर यांनी जाहीर सभेत काढले. नुसि या कामगार संघटनेतर्फे दरवर्षी ९ मे ला “नुसी फाउंडेशन डे “साजरा केला जातो. यावर्षी देखील फाउंडेशन डे बरोबरच हिंद मजदुर सभेचा अमृत महोत्सव देखील ९ मे २०२३ रोजी मस्जिद बंदर येथे साजरा करण्यात आला. आपल्या मार्गदर्शक भाषणात संजय वढावकर यांनी फाउंडेशन डे च्या शुभेच्छा देऊन सांगितले की, नाविकांच्या भविष्य निर्वाह निधीचा १०० कोटीचा घोटाळा झाला होता, ते पैसे सरकारकडून मिळाले नव्हते. त्यावेळी नुसिचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. शांती पटेल यांच्या बरोबर हिंद मजदुर सभेतर्फे शरद पवार यांच्याशी संपर्क साधून नाविकांचे १०० कोटी रुपये परत मिळाले. हिंद मजूर सभा ही सरकार, मालक व राजकीय पक्षापासून अलिप्त अशी एकमेव कामगार संघटना आहे. भारतीय रेल्वे कामगारांनी जर रेल्वे बंद केली तर, केंद्र सरकार कामगार विरोधी असलेले चार लेबर कोड बील ताबडतोब मागे घेईल, असे मला वाटते.
नॅशनल रेल्वेमेन्स युनियनचे जनरल सेक्रेटरी साथी वेणू नायर यांनी आपल्या तुफान व तडाखेबाज भाषणाने नाविकांची मने जिंकून प्रचंड टाळ्या घेतल्या. त्यांनी नुसीच्या फाउंडेशन डे ला शुभेच्छा देऊन सांगितले की, आपली संघटना अतिशय चांगल्या प्रकारे कामगार व कुटुंबासाठी कल्याणकारी योजना राबवित आहे, याचा मला आनंद वाटतो. भारतात २० कोटी बेरोजगार आहेत. कायम कामगारांची संख्या कमी होत असून, कंत्राटी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यास आम्ही रेल्वे उद्योगात कडाडून विरोध करीत आहोत. केंद्र सरकारचा रेल्वे उद्योग विकण्याचा विचार असून तो आम्ही कामगारांच्या लाल झेंड्यानी हणून पाडला आहे. रेल्वेचे १२ लाख कामगार असून रेल्वेत ५८ प्रकारच्या सवलती आहेत. मुख्यमंत्र्यांनी रेल्वेत प्रवास करून रेल्वे ही प्रवाशांसाठी सुरक्षित आहे, असे सांगितले याचा आम्हाला आनंद वाटतो.
नुसीचे जनरल सेक्रेटरी व खजिनदार मिलिंद कांदळगावकर यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितले की. दीड लाख नाविक कामगार न्यूसीचे सभासद आहेत. नुसीने आपल्या कामगार, कुटुंब व मुलांसाठी अनेक शैक्षणिक व कल्याणकारी योजना राबवित असून, स्कॉलरशिप दिली जाते. गरजू कुटुंबाना आर्थिक सहाय्य केले जाते. नुसीची लवकरच वाराणसी येथे शाखा उघडली जाईल. गोव्यात देखील आपण लवकरच हॉस्पिटल सुरू करणार आहोत. नुसी स्किल सपोर्ट यापुढेही चालू ठेवणार आहोत. नूसीतर्फे ” सागरीका ” हे मुखपत्र काढले असून, हे कामगारांचे व्यासपीठ असून त्यामध्ये कामगार आपले लेख, कविता लिहू शकतात. मेरीटाईम युनियन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी तुषार प्रधान यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पूर्वीच्या नेत्यांनी समाजासाठी व राष्ट्रासाठी खूप काम केले. भांडवलदाराविरुद्ध कामगार संघटनांनी एकत्र लढले पाहिजे. नूसी आणि एमयुआय यापुढेही एकत्र काम करीत राहणार. कॅप्टन राजेश टंडन यांनी नाविक कामगारांना फाउंडेशन डे च्या शुभेच्छा दिल्या. मोहम्मद इब्राहिम सेरंग यांचे नातू अब्दुल रहमान यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात मोहम्मद सेरंग यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत नूसीच्या स्थापनेपासूनचा संघर्षमय इतिहास सांगितला.
सभेचे सुंदर सूत्रसंचालन नुसीचे पदाधिकारी सुनील नायर यांनी केले तर आभार लुईस गोम्स यांनी मानले. याप्रसंगी पाहुण्यांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अतिशय परिश्रम घेतले. सभेला नाविक कामगार व त्यांच्या कुटुंबातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.