विनायक जितकर
‘आप’ची स्वराज्य यात्रेला राष्ट्रीय सह-सचिव गोपाल इटालिया यांची प्रमुख उपस्थिती…
कोल्हापूर – राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक व वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने पंढरपूर ते रायगड स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा 31 मे रोजी कोल्हापुरात येणार असून त्यानिमित्ताने निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे आप चे कोल्हापूर महापालिका प्रचार समिती कार्याध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 31 मे रोजी सायंकाळी 5 वाजता दसरा चौक येथे स्वराज्य यात्रेचे आगमन होईल. तेथून बाईक व रिक्षा रॅलीने यात्रा बिंदू चौक, आझाद चौक, टेंबे रोड मार्गे मिरजकर तिकटी येथे सभास्थळी पोहचेल.
गुजरात मधील लक्षवेधी कामगिरीमुळे आप ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. सुरत महापालिकेत पहिल्याच प्रयत्नात 27 नगरसेवक तर विधानसभा निवडणुकीत चाळीस लाख मते घेतली. या निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय सह-सचिव व प्रदेश सह-प्रभारी गोपाल इटालिया यांची या निर्धार सभेला प्रमुख उपस्थिती असणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आप ने कंबर कसली आहे. या सभेच्या माध्यमातून आप महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचे बिगुल वाजवणार आहे.
सभा बुधवारी सायंकाळी 6 वाजता मिरजकर तिकटी येथे होणार असून नागरिकांनी सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, संजय साळोखे, मोईन मोकाशी, विजय हेगडे, दुष्यन्त माने, अमरसिंह दळवी, बसवराज हादिमानी आदी उपस्थित होते.