राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व 2023 भूपाळी ते भैरवी कार्यक्रमाला कोल्हापूरकरांची भरभरुन दाद
कोल्हापूर : पारंपरिक लोककला नृत्य, नाट्य व संगीतातून सादर करत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या.. लहान -थोर सर्वांचे मनोरंजन करत तीन तास रसिकांना खिळवून ठेवणाऱ्या भूपाळी ते भैरवी कार्यक्रमाला कोल्हापूरकरांनी भरभरुन दाद दिली. निमित्त होतं.. राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व 2023 अंतर्गत शाहू मिलमध्ये आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांचे..! या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात पहाटेची ‘भूपाळी’, जात्यावरची ‘ओवी’, पिंगळा जोश्याचं ‘व्हनार’ अठरा पिढ्यांचा इतिहास सांगणारा ‘हेळवी’, लोकसंस्कृतीचा उपासक ‘वासुदेव’, खदखदून हसवणारा ‘बहुरुपी’, प्रबोधनात्मक ‘कडकलक्ष्मी’, नटखट ‘गवळण’, विनोदातून आध्यात्म सांगणारं ‘भारुड’, शिवरायांचा इतिहास ज्वलंत करणारी ‘शाहिरी’, लोकनाट्यातील खुसखुशीत ‘बतावणी’, लावण्यवतींची ढंगदार ‘लावणी’, आपले कुळाचार सांगणारा ‘गोंधळ’, वाघ्या-मुरळी’, ‘नंदीबैल’, ‘पोतराज’, ‘धनगरी ओवी’, ‘शेतकरी नृत्य’, ‘गजनृत्य’, ‘कोळी नृत्य’, ‘आदिवासी नृत्य’, आध्यात्माशी नाळ जोडणारे ‘दिंडी’, ‘कीर्तन’, महाराष्ट्रीय सणांची महती सांगणारी सण परंपरा ‘बैलपोळा ते गुढी पाडवा’ ऐतिहासिक दाखले देत वर्तमानावर भाष्य करणारे छत्रपती शिवरांयांचे जाज्वल्य स्वगत… आणि एकात्मतेची नाळ जोडणारी ‘भैरवी’ नृत्य, नाट्य, गीत, संगीताचा रंगारंग कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी कलाकारांनी राजर्षी शाहू महाराजांना नृत्य व गीतांतून आदरांजली वाहिली. सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक बिभीषण चवरे यांची निर्मिती असलेल्या ‘जय हो महाराष्ट्र’ हे गीत नृत्याविष्कारातून सादर करण्यात आले.
कृष्णात पाटोळे यांनी उत्कृष्ट निवेदन करत रसिकांना 3 तास खिळवून ठेवले. संपत कदम यांनी पारंपरिक लोककलांचे अस्सल सादरीकरण करत जुन्या काळाचे दर्शन घडवले. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिजित कदम यांनी हुबेहूब वठवली. तर शीतल रुगे यांनी राजर्षी शाहू महाराजांचा बाणा जपत महाराजांच्या आठवणी जाग्या केल्या. हर्षाली बेलवलकर हिने बहारदार लावणी सादर करुन टाळ्यांची दाद घेत रसिकांची मने जिंकली. संयोगिता बनसोडे आणि संजय घोलप यांनी शाहू महाराजांचे गौरव गीत सादर करत कार्याची महती विशद केली. निलेश मोहिते व समीर घोलप यांनी संगीत साद देत कार्यक्रमात रंगत आणली. गणेश मानवर यांनी नृत्य दिग्दर्शन केले. नरेंद्र हराळे, किशोर कोळी, संभाजी यादव, संतोष सूर्यवंशी, मयुरेश पाटील, मंदार कापसे, आनंदा धन्याळ, धनंजय सांळुखे, श्रावणी पाटोळे, श्रीवर्धन पाटोळे, संजय घोलप, हर्षदा गुणके, समीर घोलप, निलेश मोहिते, वैष्णवी बासूदकर, धनश्री डोंगरे, कीर्ती पोवार, प्रियदर्शनी कांबळे, समृद्धी वाघमारे, प्रियांका खराडे, प्रथमेश हेगडे, महेश नवाळे आदी कलाकारांनी कला सादर केली.