विनायक जितकर
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना चित्र तसेच शिल्पकलेच्या माध्यमातून मानवंदना
कोल्हापूर : वेळ सकाळची… कोवळे ऊन अंगावर झेलत शाहू मिलकडे जाणारी थोरा – मोठ्यांसह महाविद्यालयीन युवकांची पाऊले.. निमित्त होते.. आपल्या लोकराजाला कुंचला.. कॅनव्हास.. रंग.. ब्रश.. इझल.. आदींच्या सहायाने या कृतज्ञता पर्वात.. सकाळी ९ ते सांयकाळी ५ या वेळेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना चित्र तसेच शिल्पकलेच्या माध्यमातून मानवंदना देण्याचे…कोल्हापूरला अभिजात चित्रकलेची मोठी परंपरा आणि वारसा लाभला आहे.
चित्रकला किंवा चित्रकार म्हटले की नजरेसमोर येतात ते कलामहर्षी बाबुराव पेंटर, आबालाल रहेमान मास्तर, भाई माधवराव बागल या दिग्गज नावांनी केवळ कोल्हापुरातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील चित्रकलेच्या प्रांतांचे दालन आपल्या कुंचल्याने समृद्ध केले आहे यात शंकाच नाही. अगदी अलिकडच्या काळात या प्रातांत कार्यरत असलेल्या व भारतीय चित्रकलेत पी. एच. डी. पदवी प्राप्त करणा-या पहिल्या महिला चित्रकार दिवगंत नलिनी भागवत याही याला अपवाद नाहीत. आजही कोल्हापूरात अनेक नव्या – जुन्या पिढीतील चित्रकार कलावंत कार्यरत आहेत. महाविदयालयीन युवक ते 75 वयाच्या जेष्ठांचाही यामध्ये समावेश आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त आज आयोजित करण्यात आलेल्या या ‘रंगोत्सवात’ अनेक चित्रकारांनी आपली चित्र व शिल्पकला छत्रपती शाहू महाराजांच्या चरणी अर्पण केली. या चित्रकर्मीना जिल्हा प्रशासनाच्यावतीने रंग, ब्रश, कॅनव्हास आदी साहित्य मोफत पुरविण्यात आले होते. या चित्ररूपी कृतज्ञता महोत्सवात सुमारे ९० हून अधिक चित्रकारांनी आपला सहभाग नोंदविला.