जनसमुदायांमध्ये संविधानात समाविष्ट असणारी हक्क आणि कर्तव्य यांची जनजागृती…
कोल्हापूर – 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो. जनसमुदायांमध्ये संविधानात समाविष्ट असणारी हक्क आणि कर्तव्य यांची जनजागृती करुन संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता तसेच संविधानाबाबत जनमाणसात जाणीवजागृती होण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्यावतीने बिंदू चौकात संविधान दिन साजरा करण्यात येणार असून येथून संविधान रॅली निघणार आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार, आमदार (लोकप्रतिनिधी) तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के यांच्या उपस्थितीत 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता बिंदू चौक येथे संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात येणार आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी दिली आहे.
यात माध्यमिक शिक्षण विभागाचे महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी व्यक्ती तसेच जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा – कोल्हापूर महानगरपालिका – गंगाराम कांबळे यांची समाधी या मार्गाने पुढे छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय चौकातूनदसरा चौक येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन रॅलीचा समारोप होणार आहे.
संविधान रॅलीमध्ये जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी, एन.सी.सी, एन.एस.एस, स्काऊट गाईडचे विद्यार्थी तसेच सहायक आयुक्त समाज कल्याण यांच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व निवासी शाळा, आश्रम शाळांमधील विद्यार्थी,विद्यार्थिनी पारंपरिक वेशभुषेसह रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थी संविधानिक मूल्ये, संविधानाची कलमे, लोकशाहीची तत्वे, घोषवाक्यांचे फलक घेणार आहेत. मैदानी खेळ संघ, लेझीम पथक, झांज पथक, ढोलताशे उपलब्ध असणाऱ्या शाळा, महाविद्यालयांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवावा.
जिल्हा स्तरावरील सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, लाभार्थी मोठया प्रमाणावर सहभागी होणार असून जिल्ह्यामध्ये विविध खेळांसाठी जसे कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, खोखो व तत्सम खेळांच्या संघटनांनी देखील या रॅलीमध्ये सहभागी व्हावे. तसेच जिल्हा व शहरातील विविध सामाजिक संघटना, तरुण मंडळे, बचत गट व नागरिकांनी 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान दिनानिमित्तच्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावे, असे अवाहन सचिन साळे, यांनी केले आहे.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.













































































