भविष्यात कोकण दूध उत्पादनात धवलक्रांती करेल – प्रशांत यादव

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

धामणंदमध्ये शेतकरी मेळावा; बाबाजी जाधव यांचीही उपस्थिती, जिल्हा बँकेकडून सहकार्याचे आश्वासन…

धामणंद – वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. हा दुग्धप्रकल्प कायमच शेतकऱ्यांच्या पाठिशी राहील. शेतकऱ्यांच्या हितासाठीच या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. वाशिष्ठी डेअरीच्या सोबतीला रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि नाबार्ड हे देखील शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवायला हवी. प्रामाणिकपणे कष्ट केले, तर भविष्यात आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून कोकणात धवलक्रांती होईल आणि दूध उत्पादनात कोकण राज्यात क्रमांक एकवर पोहचेल, असा विश्वास वाशिष्ठी मिल्क ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. चे अध्यक्ष प्रशांत यादव यांनी व्यक्त केला.

दूध संकलन केंद्राचे उद्घाटन

दरम्यान, यावेळी पंधरागाव दूध उत्पादक शेतकरी कंपनी लि.च्या दूध संकलन केंद्राचे प्रशांत यादव आणि बाबाजी जाधव यांच्या हस्ते फित कापून तर नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक मंगेश कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.

पंधरागाव दूध उत्पादक शेतकरी कंपनी लिमिटेड व नाबार्ड रत्नागिरी आणि विवेकानंद रिसर्च सेंटर लोटे तसेच कृषी विभाग खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य शेतकरी मेळावा बुधवारी सकाळी धामणंद (ता. खेड) येथील श्री झोलाई मंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात श्री. यादव बोलत होते. यादव यांनी यावेळी वाशिष्ठी डेअरीच्या उभारणीचा प्रवास सांगितला. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याच्या उद्देशानेच या डेअरीची संकल्पना पुढे आणली, असे सांगितले. ते म्हणाले, कोकणात सहकार रुजला नाही, असे नेहमीच सांगत असतो. पण हे सांगत बसण्याऐवजी आपल्या कोकणची, आपल्या शेतकऱ्यांची क्षमता काय आहे, याचा अभ्यास व्हायला हवा होता. काही वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 50-60 हजार लिटर क्षमता असलेल्या शासकीय दूध डेअऱ्या होत्या. याचा अर्थ आपल्याकडची परिस्थिती दूध उत्पादनाला पोषक होती. मग आपण कमी कुठे पडलो, याचा अभ्यास आम्ही वाशिष्ठी डेअरी उभी करताना केला. तेव्हा लक्षात आले की शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्हता निर्माण करणे गरजेचे आहे. एखादे काम करताना तुमची कार्यपद्धती विश्वासार्ह असेल, तर लोक तुमच्या पाठिशी ठाम राहतात. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून ही विश्वासार्हता निर्माण करण्याचे काम केले गेले. त्यामुळेच देवरूखपासून मंडणगडच्या टोकापर्यंत आजघडीला साडेतीन हजार दूध उत्पादक शेतकरी वाशिष्ठी डेअरीशी जोडले गेले आहेत. अशा शेतकऱ्यांच्या पाठबळावरच वाशिष्ठी डेअरीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे, असेही श्री. यादव म्हणाले.

आम्ही तुम्हाला बी-बियाणे पुरवतो. तुम्ही चारा पिकवा. वाशिष्ठी डेअरी हा संपूर्ण चारा घेईल आणि डेअरीच्या माध्यमातून तो शेतकऱ्यांपर्यंत पोहचवला जाईल. शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी ठेवावी. अशा प्रामाणिक शेतकऱ्यांची हमी वाशिष्ठी डेअरी घेईल. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पशुधन वाढीसाठी या शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी यादव यांनी केले.

  • रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनीही यावेळी शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली. वाशिष्ठी डेअरीला दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून अल्प व्याजदरात कर्ज वाटप केले जाईल. नाबार्डनेही जिल्हा बँकेला त्यासाठी सहकार्याची भूमिका ठेवावी. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल. जिल्ह्यात दूध व्यवसाय वाढावा, हा यामागचा उद्देश आहे. आपल्याच जिल्ह्यात वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्प सुरू झाला आहे. आपल्याच जिल्ह्यातील दूध या डेअरीला जाते आणि आपल्या जिल्ह्यासह परजिल्ह्यातही या डेअरीची उत्पादने विक्रीसाठी पाठवली जातात. आपल्या जिल्ह्यातील आपली डेअरी म्हणून आपण सर्वांनी या प्रकल्पाच्या पाठिशी उभे राहायला हवे. वाशिष्ठी डेअरी, जिल्हा बँक आणि नाबार्ड शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याने जिल्ह्यातील दुग्धोत्पादनात क्रांती होण्यास कोणतीही अडचण नाही, असा विश्वासही यावेळी जाधव यांनी व्यक्त केला.

या मेळाव्यात सरकारी योजना व कंपन्यांसंबधी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नाबार्डचे रत्नागिरी जिल्हा विकास प्रबंधक मंगेश कुलकर्णी, लोटे येथील विवेकानंद रिसर्च सेंटरचे विवेक शेंड्ये, सह्याद्री मेडिकल चिपळूणचे कांता मानकर, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त धनंजय जगदाळे, खेड पशुसंवर्धन विभागाचे डॉ. पार्थ पाटणे, खेडमधील आत्मा संस्थेच्या अनुष्का मोहिते, राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालुकाध्यक्ष स. तु. कदम, विष्णू कदम, अजिंक्य आंब्रे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पंधरागाव दूध उत्पादक शेतकरी कंपनी लि.च्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सखाराम पालांडे, उपाध्यक्ष सुधाकर उतेकर, सचिव दत्ताराम म्हापदी आणि संस्थेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.