संशयाचे धुके, माध्यमांचा कल्लोळ आणि उद्ध्वस्त होणारी माणसे!

गावाच्या पारावर रंगणारी कुजबुज असो किंवा महानगरांतील कॉर्पोरेट कार्यालयांच्या काचेच्या केबिनमध्ये चालणारे छुपे राजकारण; आज सर्वत्र एकच अस्वस्थ करणारे चित्र पाहायला मिळते—ते म्हणजे समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याआधीच तिच्यावर ‘गुन्हेगार’ किंवा ‘चारित्र्यहीन’ असल्याचा शिक्का मारण्याची घाई! काळ बदलला, आपण आधुनिक झालो, हातात स्मार्टफोन आले; पण माणसाकडे पाहण्याची आपली नजर मात्र अधिकच संकुचित आणि कलुषित होत चालली आहे का, हा प्रश्न आज प्रत्येक सुजाण मनाला अस्वस्थ करत आहे.
संवादाची गरज आणि बुरसटलेली मानसिकता
आजच्या या कमालीच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या युगात प्रत्येक माणूस आपल्या परीने जगण्याची लढाई लढत आहे. साध्या नोकरीत राबणारा कष्टकरी असो, छोट्या-मोठ्या व्यवसायात तग धरू पाहणारा व्यापारी असो, की मोठ्या उद्योगविश्वात वावरणारा उद्योजक; प्रत्येकाच्या मनावर एक अदृश्य ताण आहे. या मानसिक घुसमटीतून थोडे मोकळे होण्यासाठी, मनातील मळभ दूर करण्यासाठी प्रत्येकाला कोणाशी तरी मनमोकळेपणाने बोलावसे वाटते. आजच्या काळात निखळ मैत्री, परस्परांना समजून घेणारे सहकार्य आणि मन हलके करणारे संवाद हे मानसिक आरोग्यासाठी संजीवनीसारखे असतात.
मात्र, आपल्या समाजाची मानसिकता इतकी बुरसटलेली झाली आहे की, एखादा तरुण मुलगा-मुलगी एकत्र दिसले किंवा एखादी एकटी स्त्री कोणाशी दोन शब्द बोलताना दिसली, तर त्यांच्यात लगेचच ‘अफेअर’ असल्याचे तर्क लढवले जातात. बोलणे आणि भेटणे म्हणजे अनैतिक संबंध नव्हे, हे भानच जणू हरपले आहे. एखाद्या साध्या वाक्याचा जो अर्थ बोलणाऱ्याच्या मनातही नसतो, तो अर्थ काढून वादाचे मोहोळ उठवले जाते आणि निरपराध व्यक्तीवर विनाकारण पश्चात्तापाची वेळ येते.
कायदा हातात घेण्याची घातक प्रवृत्ती 

सध्या देशात तरुण जोडप्यांना किंवा सोबत फिरणाऱ्या मित्र-मैत्रिणींना केवळ गैरसमजातून आणि संस्कृती रक्षणाच्या नावाखाली मारहाण करण्याच्या घटनाही समोर येत आहेत. कोणतीही शहानिशा न करता केवळ संशयावरून कायदा हातात घेण्याची ही प्रवृत्ती अत्यंत घातक आहे. अनेकदा अशी संकुचित मनोवृत्ती बाळगणारे लोक स्वतःच गैरसमजाच्या आणि संशयाच्या भानगडीत अडकतात. इतरांच्या आयुष्यात डोकावण्याच्या नादात ते स्वतःचे मानसिक स्वास्थ्य गमावतात आणि कायदेशीर व सामाजिक कचाट्यात फसतात.
‘मीडिया ट्रायल’चा आभासी कल्लोळ
या सामाजिक असहिष्णुतेला आता ‘स्वयंघोषित मीडिया ट्रायल’ची जोड मिळाली आहे. ‘ब्रेकिंग न्यूज’ आणि ‘व्ह्यूज’च्या आंधळ्या शर्यतीत कोणाच्याही खाजगी आयुष्याचा तमाशा करणे हा जणू एक उद्योगच बनला आहे. अनेकदा चूक एकाने केलेली असते, पण त्या मार्गावरून कधीच न जाणारी एखादी सरळमार्गी व्यक्ती केवळ योगायोगाने किंवा रस्ता चुकून नेमकी त्याच घटनास्थळी दिसते. नेमक्या त्याच क्षणाचा कोणीतरी व्हिडिओ काढतो आणि क्षणात तो समाजमाध्यमांवर व्हायरल होतो.
दुर्दैवाची बाब म्हणजे, या आभासी कल्लोळाच्या दबावाखाली अनेकदा तपास यंत्रणाही सुरुवातीला त्याच चष्म्यातून तपास रंगवतात. घटनेच्या मुळाशी न जाता, सत्याची शहानिशा न करता तातडीने अटक केली जाते आणि एका चांगल्या माणसाच्या आयुष्याची राखरांगोळी होते. वर्षानुवर्षे न्यायालयाचे उंबरठे झिजवल्यानंतर ती व्यक्ती ‘निर्दोष’ तर ठरते; पण तोपर्यंत तिचे करिअर, प्रतिष्ठा आणि संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेले असते. व्यावसायिक क्षेत्रात तर एखाद्याला संपवण्यासाठी अशी बदनामीची षडयंत्रे जाणीवपूर्वक रचली जातात आणि साधी, सरळ माणसे या चक्रव्युहात निष्पाप असूनही अडकली जातात.
कलाकृतींनीही दाखवलाय समाजाला आरसा

समाजातील या उतावीळपणाचे आणि ‘मीडिया ट्रायल’चे भयावह वास्तव आपल्या काही संवेदनशील कलाकृतींनीही अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. ‘मिस्टर सेलिब्रिटी’ (Mr. Celebrity) या दाक्षिणात्य चित्रपटात केवळ ‘व्ह्यूज’ वाढवण्याच्या आणि केस निकाली काढण्याच्या घाईत एका प्रतिभावान, पद्मश्री पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञाचे संपूर्ण कुटुंब कसे उद्ध्वस्त होते, याचे हृदयद्रावक चित्रण केले आहे. यासोबतच ‘सेक्शन ३७५’ (Section 375) किंवा ‘पिंक’ (Pink) सारख्या चित्रपटांनी आणि मराठी रंगभूमीवरील अनेक दर्जेदार नाटकांनीही सत्याची दुसरी बाजू तपासण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आरसा दाखवणाऱ्या या कलाकृती प्रत्येक सुजाण नागरिकाने आवर्जून पाहायला हव्यात, जेणेकरून कोणाच्याही आयुष्याचा तमाशा करण्यापूर्वी आपली सदसद्विवेकबुद्धी जागी राहील.
घराचा कोंडमारा आणि समुपदेशनाची गरज
या सगळ्या खोट्या बदनामीचा सर्वात भयानक आणि हृदयद्रावक परिणाम होतो तो त्या व्यक्तीच्या घरावर! बाहेरच्या जगातील संशयाचे वारे घराच्या उंबरठ्यावर येऊन धडकतात आणि हसत्या-खेळत्या संसाराचा कोंडमारा सुरू होतो. घरातील सुसंवाद हरवतो. वर्षानुवर्षांची घट्ट मैत्री एका गैरसमजामुळे तुटते. पती-पत्नीमध्ये संशयाची दरी निर्माण होते. जेव्हा स्वतःच्याच माणसांचा विश्वास डळमळीत होतो आणि समाजाचे टोमणे असह्य होतात, तेव्हा बदनामीच्या या काळोखात अनेक निष्पाप जीव नैराश्याच्या गर्तेत ढकलले जातात आणि अखेर आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात.
अशा कठीण प्रसंगी त्या व्यक्तीला आणि तिच्या कुटुंबाला समाजाच्या कठोर नजरांची नाही, तर प्रेमाची, विश्वासाची आणि योग्य समुपदेशनाची (Counselling) नितांत गरज असते. संकटाच्या काळात आपल्या माणसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि तज्ज्ञ समुपदेशकांच्या मदतीने घरातील तुटलेला संवाद पुन्हा जोडणे, हाच यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे.
कोणालाही ‘जज’ करण्यापूर्वी थांबा!
आपण एक सत्य कायम लक्षात ठेवले पाहिजे की, या रंगमंचावर प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या भूमिकांत वावरत असते. जशी परिस्थिती येते, तसे तिला जगावे लागते; प्रत्येकाला नेहमीच आपल्या मनासारखे जगता येते असे नाही. कोणी स्वभावाने अत्यंत शांत आणि संयमी असते, तर कोणी धाडसी किंवा स्पष्टवक्ते असते. एखाद्याचा स्वभाव वेगळा आहे किंवा ती व्यक्ती चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी दिसली, याचा अर्थ ती गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे असा होत नाही. त्यामुळे कोणाबद्दलही क्षणात मत बनवण्यापूर्वी आणि कोणालाही ‘जज’ करण्यापूर्वी दोन पावले मागे घ्या, विचार करा. कारण तुमचा एक गैरसमज आणि शेअर केलेली एक पोस्ट कोणाचे तरी संपूर्ण जग उद्ध्वस्त करू शकते!