बळीराजासाठी कृषी पर्वणी! कोल्हापुरात कृषी महाकुंभ!४ डिसेंबरपासून ‘सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन’

कोल्हापूर WATCH TEAM:
राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक तंत्रज्ञान, अद्ययावत अवजारे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापूर येथील तपोवन मैदानावर येत्या ४ ते ७ डिसेंबर २०२६ या कालावधीत भव्य ‘सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले आहे. डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, ‘आत्मा’ आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात येणाऱ्या या प्रदर्शनाचे हे ८ वे वर्ष आहे.
आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत या उपक्रमाची माहिती दिली. या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवार, ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मानल्या जाणाऱ्या या कृषी मेळाव्यात देश-विदेशातील २०० हून अधिक नामांकित कृषी कंपन्या आणि २०० हून अधिक विविध प्रजातींचे पशुपक्षी सहभागी होणार आहेत.
प्रदर्शनाची प्रमुख वैशिष्ट्ये :
    • अद्ययावत तंत्रज्ञान : कोठारी पाईप, कॅप्टन ट्रॅक्टर, कुबोटा ट्रॅक्टर, शक्तीमान रोटावेटर, केपीटी इंडस्ट्रीज यांसह १०० हून अधिक नामांकित कंपन्यांची आधुनिक शेती अवजारे व मशिनरी पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी.
    • शेतकरी ते ग्राहक थेट विक्री : प्रदर्शनात विशेष ‘तांदूळ व धान्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून, महिला बचत गटांसाठी मोफत स्टॉल्सची सोय करण्यात आली आहे.
    • मार्गदर्शन व करमणूक : शेतीविषयक तज्ज्ञांची चर्चासत्रे, आकर्षक पुष्पप्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि लहान मुलांसाठी विशेष अम्युझमेंट पार्क असणार आहे.

या प्रदर्शनाला गोकुळ, चितळे डेअरी, संजय घोडावत ग्रुप, महालक्ष्मी बिझनेस ग्रुप आणि महालक्ष्मी शेती विकास केंद्राचे प्रायोजकत्व लाभले आहे. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी असोसिएशन ऑफ कोल्हापूर बी-बियाणे, कीटकनाशके व रासायनिक खते संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील, धीरज पाटील, सुनील काटकर आणि स्वप्नील सावंत विशेष परिश्रम घेत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी या चारदिवसीय प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.