चिपळूण वैद्य मंडळ व श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आयुर्वेदिक चिकित्सा व उपचार शिबीर…
चिपळूण – श्रावण मासानिमित्त चिपळूण वैद्य मंडळ व श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आयुर्वेदिक चिकित्सा व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबीराचे हे एकोणिसावे (१९ वे) वर्ष आहे. गुरुवार १७ ऑगस्ट ते गुरुवार २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत जुन्या भैरी मंदिरा समोरील चिपळूण वैद्य मंडळ दवाखाना येथे सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते दुपारी १ व सायंकाळी ५ ते ६ या कालावधीत सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीराला श्री सदगुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट, कोल्हापूर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या शिबीरात सकाळ सत्रात सोमवारी वैद्य रत्नाकर थत्ते, मंगळवारी वैद्य विद्यानंद दीक्षित, बुधवारी वैद्य सत्यजित एकांडे, गुरुवारी वैद्य सिद्धी जोशी, शुक्रवारी वैद्य वृषाली बापट, शनिवारी वैद्य माधवी साठे व वैद्य वीणा कानडे, तसेच दररोज सांयकाळच्या सत्रात वैद्य रत्नाकर थत्ते हे रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करणार आहेत. दररोज सायंकाळी ४ ते ५ या कालावधीत हरिविजय ग्रंथ पारायण होणार आहे. तरी या शिबीराचा सर्व गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चिपळूणचे अध्यक्ष मोहन मिरगल व चिपळूण वैद्य मंडळ अध्यक्ष रत्नाकर थत्ते यांनी केले आहे.