चिपळूणच्या तरुणाच्या हत्येचा कोल्हापुरात छडा; सांगलीतील संशयित जेरबंद, तपास पथकाला ३० हजारांचे बक्षीस
चिपळूण-WATCH TEAM प्रशांत परब. : निर्जन जागेतील रक्ताने माखलेला मृतदेह… डोक्यावर गंभीर वार… घटनास्थळी पडलेला रक्ताळलेला जांभा दगड… मृताची ओळख पटविण्यापासून सुरू झालेला तपास आणि आरोपीपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान! मात्र, चिपळूण पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हार मानली नाही. एकामागून एक धागे जोडत, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि कॉल डिटेल्सचे तांत्रिक विश्लेषण करत पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत वालोपे खूनप्रकरणाचा छडा लावला. सांगली जिल्ह्यातील संशयित पवन आंबेडे याला कोल्हापुरातून ताब्यात घेण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तपास पथकाला पोलीस अधीक्षकांनी ३० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
रक्ताळलेल्या मृतदेहाने तपासाला सुरुवात…
१६ नोव्हेंबर रोजी डायल ११२ वर वालोपे परिसरात खून झाल्याची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एका पानटपरीच्या मागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत तरुणाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. डोक्यावर गंभीर जखमा होत्या, तर जवळच रक्ताने माखलेला जांभा दगड पडला होता. याच दगडाने डोक्यावर प्रहार करून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज होता.
मात्र, पोलिसांसमोर पहिले आव्हान होते ते मृताची ओळख पटविण्याचे. तपासाची सूत्रे हलविल्यानंतर मृत तरुण नवनाथ बबन कांबळे (वय ३१, मूळ रा. कडेगाव, जि. सांगली) असल्याचे स्पष्ट झाले. तो चिपळूणमध्ये मामाकडे राहत होता.
५० ते ७० कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले; कॉल डिटेल्समधून मिळाला धागा!
घटनास्थळी आरोपीपर्यंत पोहोचवणारा ठोस प्रत्यक्ष पुरावा नसल्याने तपासाचे मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत पोलिसांनी तांत्रिक तपासाला प्राधान्य दिले. रेल्वे स्थानक परिसरापासून महामार्गापर्यंतच्या मार्गावरील तब्बल ५० ते ७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेजची तपासणी करण्यात आली.केवळ सीसीटीव्हीवर न थांबता पोलिसांनी ३० ते ४० संशयितांचे कॉल डिटेल्स तपासले. त्यांच्या संपर्कातील व्यक्ती, हालचाली आणि उपलब्ध तांत्रिक माहितीचे विश्लेषण करण्यात आले. प्रत्येक धाग्याची पडताळणी करत तपासाची दिशा निश्चित करण्यात आली. या बारकाईच्या तपासातून अखेर संशयितापर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागला.
सांगलीतील संशयिताचा माग काढला थेट कोल्हापुरात!
तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी येथील पवन आंबेडे याच्यावर संशय निश्चित केला. त्यानंतर त्याचा माग काढत पोलिसांनी कोल्हापुरात सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.हत्येमागील नेमके कारण काय? आर्थिक व्यवहारांचा काही संबंध आहे का? या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.
संघटित तपासाला यश; पथकाला ३० हजारांचे बक्षीस
ही संपूर्ण कामगिरी चिपळूणचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या कारवाईत उपनिरीक्षक आगाव, राजेश यादव, विकास निकम यांच्यासह शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विविध पातळ्यांवर समन्वय साधत तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स यांची सांगड घालून पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली.
गुन्ह्याचा तपास करताना दाखवलेली तत्परता, तांत्रिक कौशल्य आणि पथकातील समन्वय यांची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी तपास पथकाला ३० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे. अवघ्या पाच दिवसांत खुनाच्या गुन्ह्याचा तपास संशयितापर्यंत पोहोचविणाऱ्या चिपळूण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
























