गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्था बळकटीकरणाच्या अनुषंगाने बैठक
कोल्हापूर – जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू असलेली विकास कामे ही तेथील संबंधित लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी यांच्या समन्वयाने व्हावीत अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभाग अंतर्गत क्षेत्रीय स्तरावर गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्था बळकटीकरणाच्या अनुषंगाने आज बैठक घेण्यात आली.
ते पुढे म्हणाले, भूमि अभिलेख कार्यालयाच्या कामकाज पद्धतीतील गतिमानता सामान्य लोकांच्या निदर्शनास यावी तसेच सरकारी कार्यालये ही अधिक टापटीप व स्वच्छ असावीत. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात येणाऱ्या विविध इमारती या त्या त्या गावाच्या वैभव वाढवणाऱ्या असाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर बांधकाम विभागाकडून उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या कामकाजाच्या अनुषंगाने तेथील सोयी सुविधा आणि बांधकाम हे मेडिकल ऑफिसरच्या निदर्शनास आणावे. तसेच त्यांच्या सूचना ही संबंधितांनी लक्षात घ्याव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी केली. यावेळी राधानगरी, चंदगड आणि कोडोली या ठिकाणी अद्यावत रुग्णालयाच्या उभारणी संदर्भातील नियोजनाबाबत स्लाईड शो द्वारे सादरीकरण करण्यात आले.
या बैठकीनंतर पालकमंत्री आबिटकर यांनी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची एक छोटेखानी आढावा बैठक घेतली. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, कोल्हापूर शहराला सुनियोजितता आणण्यासाठी प्राधिकरणाची महत्त्वाची भूमिका आहे. भविष्यात बांधकाम परवाने देताना सर्व निकषांचे पालन करूनच परवाने देण्यात यावेत. तसेच जिल्हाधिकारी यांच्या समवेत बसून आराखडे (प्लॅन) तयार करावेत असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
या बैठकीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, भूमी अभिलेख कार्यालयाचे शिवाजी भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे क्रांतीकुमार मिरजकर, भाऊसाहेब हजारे, जिल्हा सह निबंधक अशोक आठवले, सी. ए. आयरेकर, एस. बी. इंगवले, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्यासह संबंधित विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.












































































